ट्रम्पनंतर आता नाटोचीही रशियाला धमकी; रशियाच्या व्यापारी भागीदारांना 100 टक्के टॅरिफ लावणार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. ट्रम्प यांनी रशिया-युक्रेनमधील दीर्घकाळ चालणारे युद्ध थांबवण्यासाठी टॅरिफचा शस्त्रासारखा वापर करत आहेत. ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना 50 दिवसांत युक्रेनशी युद्ध थांबवण्याची सूचना केली आहे. युद्ध थांबले नाही तरमोठ्या प्रमाणात टॅरिफला सामोरे जावे लागेल, अशी धमकीही दिली आहे. त्याला रशियानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आले. आता नाटोने रशियासोबत व्यवसाय करणाऱ्या देशांना इशारा दिला आहे की जर त्यांनी रशियासोबत व्यापार सुरू ठेवला तर त्यांना 100 टक्के टॅरिफला सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत, व्यापार युद्धाची भीती पुन्हा एकदा गडद होऊ लागली आहे. त्याचा थेट परिणाम चीन, ब्राझील आणि हिंदुस्थानसारख्या देशांवर होणार आहे.
नाटोने रशिया आणि त्यांच्या व्यापारी भागिदारांना इशार दिला आहे. अमेरिकन सिनेटरसोबतच्या बैठकीत, नाटोचे सरचिटणीस मार्क रूट म्हणाले की, रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियन तेल आणि वायू आयात करणाऱ्या देशांना कठोर निर्बंधांना सामोरे जाऊ शकतात. त्यांच्यावर 100 टक्के कर लादला जाऊ शकतो. रूट यांनी हिंदुस्थान, चीन आणि ब्राझीलला रशियासोबतच्या त्यांच्या सध्याच्या व्यापाराबद्दल इशारा दिला आहे.
मार्क रूट यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, रशियाने युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्याच्या सल्ल्याला गांभीर्याने घेतले नाही तर त्यांना आर्थिकदृष्ट्या एकटे पाडण्यासाठी कठोर कर लादले जातील. नाटोच्या सरचिटणीसांनी इतर देशांनी शांतता चर्चेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना राजी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. नाटोशी झालेल्या बैठकीनंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी रशियावर दबाव आणताना स्पष्टपणे सांगितले होते की ,जर 50 दिवसांनंतरही युद्धाबंदीसाठी कोणताही करार झाला नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील. त्यांच्यावर कठोर करांसह इतर निर्बंध लादले जातील. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प प्रशासन रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दुय्यम कर लादण्याची तयारी करत आहे, जे 100 टक्क्यांपर्यंत असू शकते, असेही त्यांनी सूचित केले होते.
ट्रम्पच्या धमकीनंतर दुसऱ्याच दिवशी रशियानेही प्रत्युत्तर दिले. डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्यावर मंगळवारी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, ‘अमेरिकेचे अध्यक्ष धमकी का देत आहेत हे आम्हाला समजून घ्यायचे आहे आणि मला शंका नाही की आम्हाला नवीन निर्बंधांना सामोरे जावे लागेल.’ अमेरिका आणि रशियामधील या तणावामुळे व्यापार युद्धाची शक्यता पुन्हा एकदा वाढू लागली आहे आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता वाढली आहे.
रशियाकडून कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांच्या यादीत चीन, तुर्की, ब्राझील तसेच हिंदुस्थान यांचा समावेश आहे आणि जर ट्रम्प-नाटोच्या धमकीनुसार, रशियाने 50 दिवसांच्या मुदतीत आपली भूमिका बदलली नाही तर रशियातून तेल खरेदी करणाऱ्या सर्व देशांसाठी मोठ्या संकटाची नांदी ठरणार आहे. आखातातील तणावादरम्यान हिंदुस्थानने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे. आखाती देशांपेक्षा रशियाकडून हिंदुस्थानात जास्त कच्चे तेल येत आहे. कोणत्याही प्रकारचे कठोर निर्बंध लागू केले गेले तर तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्यासोबतच खर्चातही मोठी वाढ होऊ शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List