कोकणात पावसाचे धुमशान; रायगडात रेड तर रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट; अनेक गावांचा संपर्क तुटला
पावसाने दोन दिवसांपासून कोकणपट्टीत अक्षरशः पिंगा घातला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात कोसळलेल्या तुफानी पावसाने कोकणवासीयांची पुरती कोंडी केली. रायगड जिह्यातील माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड, पोलादपूरमधील नद्यांना पूर आले. गावागावात पाणी घुसले. बाजारपेठा पाण्याखाली गेल्या. अनेक गावांचा संपर्क तुटला. रायगड जिह्याला रेड अलर्ट तर रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. त्यामुळे रायगडात सहा तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. रत्नागिरीतील संगमेश्वर, मंडणगड, दापोली आणि सिंधुदुर्गातील दोडामार्ग, सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यात धुवांधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
- पनवेलमधील पोयंजे गावाच्या नदीपात्रात काही महिला कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिला पुरात अडकल्या असता स्थानिक तरुणांनी प्राणाची बाजी लावून या महिलांना बाहेर काढले.
- रत्नागिरीच्या ओझरखोल येथे दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
- सिंधुदुर्ग जिह्यातील अनेक भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या 24 तासात दोडामार्गात 123 मिमी, सावंतवाडीत 114 मिमी पावसाची नोंद झाली.
- महाडच्या सावित्री व रोह्याच्या कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि अनेक गावांत पुराचे पाणी शिरले.
- रत्नागिरी जिह्यात नॉनस्टॉप पाऊस सुरू असून लांजा तालुक्याला झोडपून काढले आहे. काजळी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने लांजातील अंजनारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. संगमेश्वरातही 142 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- जगबुडी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित भागाला सतर्कतेचा इशारा देऊन स्थलांतर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंडणगडमध्येही पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
माणगाव खोऱ्यात 25 गावात ब्लॅकआऊट
सिंधुदुर्ग जिह्यातील अनेक भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या 24 तासात दोडामार्गात 123 मिमी, सावंतवाडीत 114 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या 14 तासांपासून कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील 25 गावांचा वीजपुरवठा बंद झाल्याने या गावांमध्ये ब्लॅकआऊट झाला आहे. सावंतवाडीत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रूपणवाडी आंबेगाव येथील एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून वाहून गेला. प्रशांत दळवी असे या तरुणाचे नाव आहे.
रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग बंद
शिवभक्त आणि पर्यटकांचा सतत राबता असणाऱ्या किल्ले रायगडचा पायरी मार्ग आज प्रशासनाने पावसाळा संपेपर्यंत बंद करण्यात आल्याचे जाहीर केले. जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. दरम्यान, म्हसळा तालुक्यात ढोरजे गावाला जोडणारा पूल पुरात बुडाला. यामुळे पाच गावांचा संपर्क तुटला. म्हसळा, दिघी मार्गावरही पाणी तुंबले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List