मुंबई गुजरातची राजधानी होती! केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांची मिंधेगिरी
शहा सेनेचा गुजरातचा पुळका काही सुटत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर लोटांगण घालत ‘जय गुजरात’चा नारा दिला होता. त्यावरून त्यांच्यावर सुरू झालेला टीकांचा भडिमार अद्याप थांबलेला नाही तोच मिंधे गटाने दुसरा प्रताप केला आहे. मिंधे गटाचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी मुंबई ही गुजरातची राजधानी होती असा दावा केला आहे. त्यावरून पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे.
‘जय गुजरात’वरून एकनाथ मिंधे चांगलेच वादात अडकले आहेत. त्यांच्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून आणि मराठी माणसांकडून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. त्यावरून शिंदे टेन्शनमध्ये आहेत आणि त्यांच्या मिंधे गटातील नेत्यांनाही जिथे जावे तिथे यावरून स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.
प्रतापराव जाधव हे धाराशीवमध्ये तुळजा भवानीच्या दर्शनाला आले होते. दर्शनानंतर प्रसारमाध्यमांनी याच मुद्दय़ावरून त्यांना छेडले असता जाधव यांनी शिंदेंची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. पण ते करत असताना त्यांनीच नवे वादग्रस्त विधान केले. संयुक्त महाराष्ट्र असताना मुंबई ही गुजरातची राजधानी होती असे ते म्हणाले.
गुजरातचा स्वाभिमान जपायला शिंदेंनी नारा दिला
गुजरात हे पाकिस्तानातले राज्य नाही, महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य आहे, त्यामुळे ‘जय गुजरात’ म्हणण्यात काही वादग्रस्त नाही अशी सारवासारव करण्याचा प्रयत्नही यावेळी जाधव यांनी केला. मुंबईतही गुजराती लोक राहतात, एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर तेथील लोकांचा स्वाभिमान जपण्यासाठी आपण नारा देतो, तसाच गुजरातचा स्वाभिमान जपण्यासाठी शिंदेंनी नारा दिला, असे ते म्हणाले. जाधव यांच्या या वक्तव्याचा मुद्दा उद्या विरोधकांकडून विधिमंडळ अधिवेशनात उठवला जाण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List