मी मराठी माध्यमातूनच शिकलो! मातृभाषेतील शिक्षणामुळे सखोल ज्ञान मिळते – सरन्यायाधीश गवई
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी गिरगावच्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलला भेट दिली. याच शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते. शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी मराठी भाषेवर प्रेम व्यक्त केले. मी स्वतः मराठी माध्यमात शिकलोय. मातृभाषेत शिक्षण घेतल्याने विषयांची सखोल समज येते. आयुष्यभर सोबत राहणारी चांगली मूल्ये प्राप्त होतात. मी आज सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचलोय हे गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळेच शक्य झालेय, अशी कृतज्ञता सरन्यायाधीशांनी व्यक्त केली.
सरन्यायाधीश गवई यांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये झाले होते. शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी रविवारी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार, चिकित्सक समूहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकर, सचिव डॉ. गुरुनाथ पंडित, मुख्याध्यापिका संचिता गावडे हे मान्यवर उपस्थित होते. शाळेतर्फे सरन्यायाधीशांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या समारंभात बोलताना सरन्यायाधीश भावुक झाले. आज मी ज्या उंचीवर पोहोचलोय त्यात माझ्या शिक्षकांचे व चिकित्सक समूह शिरोळकर शाळेचे मोठे योगदान आहे. शाळेतून मिळालेले शिक्षण आणि मूल्यांमुळे माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली. माझे वत्तृत्व कौशल्य येथेच विकसित झाले. वत्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी आत्मविश्वास दिला. शाळेतून मिळालेली मूल्ये आयुष्यभर आपल्या सोबत राहतात, अशी भावना सरन्यायाधीश गवई यांनी शाळेतील मुलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केली.
पाच पैशांत पट्टीचा समोसा मिळायचा!
सरन्यायाधीशांनी वर्गातील बाकावर बसून मित्रांसोबतचे जुने किस्से सांगितले. त्यावेळी आम्ही पाच पैशांत पट्टीचा समोसा खायचो. मिसळपाव 10 पैशांत मिळायची. घरातून लवकर निघावे लागायचे. त्यामुळे अनेकदा घरातून डबा मिळायचा नाही. मित्रांसोबत खूप खेळलो, बागडलो. मारामाऱ्याही केल्या, असे नमूद करतानाच आजच्या पिढीतील मुलांना कामाप्रति निष्ठा आणि एकाग्रता ठेवण्याचा सल्ला दिला. स्वतःवर आत्मविश्वास ठेवला तर या विश्वात काहीही अशक्य नाही, असेही ते म्हणाले.
पुन्हा वर्गातील बाकावर बसताच झाले भावुक
सरन्यायाधीश गवई यांनी वर्गखोल्या, वाचन कक्ष, चित्रकला विभाग इत्यादींची पाहणी केली. तसेच जुन्या वर्गमित्र-मैत्रिणींना भेटून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. वर्गात जाऊन बाकावर बसताच त्यांना जुने दिवस आठवले आणि ते खूप भावुक झाले. याक्षणी विद्यार्थ्यांनी त्यांना अभिवादन केले. विद्यार्थ्यांकडून मिळालेले प्रेम अतिशय भावनिक आणि अभिमानास्पद क्षण आहेत, असे मत सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List