वडिलांचे अफेअर्स असूनही आई घटस्फोट का देत नाही? सूरज पांचोलीने सांगितलं खरं कारण
अभिनेता सूरज पांचोली नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या कुटुंबाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. सूरज हा अभिनेता आदित्य पांचोली आणि झरीना वहाब यांचा मुलगा आहे. आदित्य पांचोली अनेकदा त्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समुळे चर्चेत आला होता. खुद्द त्यानेसुद्धा अभिनेत्री कंगना राणौतसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल माहीत असूनही आईने अद्याप घटस्फोट का घेतला नाही, याचं उत्तर सूरजने या मुलाखतीत दिलं.
‘हिंदी रश’ या पॉडकास्टमध्ये सूरज म्हणाला, “मला माझ्या वडिलांसारखं वडील आणि माझ्या आईसारखं पार्टनर व्हायला आवडेल. ती संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवते आणि आमच्यामुळे तिने खूप काही सहन केलंय. तरीसुद्धा मी तिला कधीच खचलेलं पाहिलं नाही. तिने कधीच कोणत्या गोष्टीची तक्रार केली नाही.” महिलेनं तक्रारी न करता राहणं चांगली गोष्ट आहे का, असा प्रश्न विचारला असता सूरज पुढे म्हणाला, “ती तिचे पैसे कमावतेय. तिने माझ्या वडिलांकडून कधीच एक रुपयासुद्धा घेतला नाही.”
झरीना कशाप्रकारे स्वत:च्या कष्टाने पैसे कमवतेय आणि पती आदित्यला घटस्फोट देणं शक्य असतानाही तिने का दिलं नाही, याबद्दलही त्याने सांगितलं. “ती वयाच्या 16 व्या वर्षापासून अभिनयक्षेत्रात काम करतेय. आता ती जवळपास 65 वर्षांची आहे. तिने स्वत:च्या बळावर सर्वस्व निर्माण केलंय. तिची स्वत:ची चार घरं आहेत. जर तिला वडिलांना सोडायचं असतं तर तिने कधीच सोडलं असतं. कधीकधी महिलांकडे काही बॅकअप किंवा आर्थिक सक्षमता नसते, म्हणून ते पार्टनरला सोडू शकत नाहीत. पण माझी आई हैदराबादला जाऊ शकते, तिचं वांद्र्यातही एक घर आहे. वांद्र्यात तिच्या आईचंही घर आहे. तिला चार बहिणी आहेत. त्यापैकी एक अमेरिकेत राहते. तिला चार भावंडं आहेत. ती कधीही सोडून जाऊ शकली असती. पण तिने राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या निर्णयांवर मी मतं मांडू शकत नाही”, असं तो म्हणाला.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत झरीनासुद्धा तिच्या पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. मी माझ्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दु:खी नाही, असं तिने म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर पतीच्या अशा अफेअर्ससाठी तिने त्या मुलींना जबाबदार ठरवलंय, जे आदित्यसोबत तो विवाहित असल्याचं माहीत असूनही रिलेशनशिपमध्ये असायचे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List