वर्गात गैरहजर राहिल्यास व्हिसा रद्द, अमेरिकेने परदेशी विद्यार्थ्यांना दिला कडक इशारा
अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी त्यांचा क्लास बुडवला किंवा कोणतीही सूचना न देता शिक्षण बंद केले तर त्यांचा व्हिसा रद्द होऊ शकतो. अवैध घुसखोरी रोखण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईअंतर्गत अमेरिकेने हा इशारा दिला.
हिंदुस्थानातील अमेरिकन दूतावासाने याबाबत अधिपृत निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात म्हटले आहे की, जर तुम्ही तुमच्या विद्यापीठाला सूचना न देता एखादा अभ्यासक्रम सोडला, वर्ग चुकवले किंवा तुमच्या अभ्यासक्रमातून माघार घेतली तर तुमचा विद्यार्थी व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. यामुळे तुम्हाला भविष्यात अमेरिकन व्हिसा मिळण्यापासून रोखले जाईल. तुमच्या व्हिसाच्या अटींचे नेहमी पालन करा आणि कोणत्याही समस्या टाळण्यासाठी विद्यार्थी दर्जा कायम ठेवा.
धोरण आणखी कडक
ट्रम्प सरकारने परदेशी विद्यार्थ्यांविरोधातील धोरण आणखी कडक केले आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेत परदेशी विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा अचानक आणि पूर्वसूचना न देता रद्द केले जात आहेत. काही प्रकरणे पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांमध्ये सहभाग, वाहतूक नियमांचे उल्लंघन किंवा व्हिसा अटींचे उल्लंघन अशा विविध कारणांशी जोडली आहेत. काही दिवसांपूर्वी हार्वर्ड विद्यापीठाला नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची परवानगी नाकारण्यात आली, यामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List