अॅपलने हिंदुस्थानात iPhone बनवू नयेत, ट्रम्प यांचा सीईओ टिम कुकना आदेश
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 15 मे रोजी कतारमध्ये एक विधान केले. सध्या या विधानाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. कतारची राजधानी दोहा येथे झालेल्या एका व्यावसायिक कार्यक्रमादरम्यान अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्याबद्दल मोठे विधान केले. ट्रम्प म्हणाले की, त्यांनी टिम कुकला स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांचे उत्पादन फक्त हिंदुस्थानी बाजारपेठेसाठी असेल तर हिंदुस्थानात कारखाना बांधावा. तुम्ही हिंदुस्थानात उत्पादन करावे यात आम्हाला रस नाही.
आपल्या निवेदनात ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की, हिंदुस्थानने अमेरिकेसोबत एक व्यापार प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावा अंतर्गत अमेरिकन उत्पादनांवर कोणतेही आयात शुल्क (टॅरिफ) लादले जाणार नाही. ते म्हणाले, ” हिंदुस्थानने आम्हाला एक करार दिला आहे, यात ते कोणतेही शुल्क लादण्यास तयार नाहीत.” अॅपल आधीच त्यांच्या उत्पादनाचा मोठा भाग चीनमधून हिंदुस्थानात हलवण्याची योजना आखत आहे.
एका अहवालानुसार, 2026 च्या अखेरीस अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन हिंदुस्थानामध्ये बनवायचे आहेत. सध्या अमेरिकेत विकले जाणारे सुमारे 80% आयफोन चीनमध्ये बनवले जातात, तर अॅपल दरवर्षी अमेरिकेत 6 कोटींहून अधिक आयफोन विकते.
हिंदुस्थानात आयफोनचे उत्पादन सध्या चीनपेक्षा 5-10% जास्त महाग आहे. असे असूनही, चीनमधून आयात केलेल्या उत्पादनांवर मोठे शुल्क टाळण्यासाठी अॅपलने हिंदुस्थानात उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे. मार्च 2025 मध्येच, अॅपलने हिंदुस्थानातून अमेरिकेत 600 टन आयफोन पाठवले, ज्याची एकूण किंमत 2 अब्ज डॉलर्स होती. यापैकी एकट्या फॉक्सकॉनने 1.3 अब्ज डॉलर्सचे आयफोन पाठवले.
अलिकडेच अमेरिकेने हिंदुस्थानातील आयातीवर 26% कर लादला होता. चीनमधील आयातीपेक्षा खूपच कमी आहे. अमेरिकेने आता हिंदुस्थानासह बहुतेक देशांवर लादलेले शुल्क 3 महिन्यांसाठी पुढे ढकलले आहे. या सवलतीत चीनचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे स्पष्ट होते की अमेरिका अजूनही चीनविरुद्ध कठोर भूमिका घेत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावरून असे दिसून येते की अमेरिका परदेशात उत्पादन करण्याऐवजी देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देऊ इच्छित आहे. दुसरीकडे, अॅपलसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या हिंदुस्थानकडे पर्यायी उत्पादन केंद्र म्हणून पाहत आहेत. हिंदुस्थानात उत्पादन वाढवणे कंपन्यांसाठी लॉजिस्टिक्स आणि टॅरिफच्या बाबतीत फायदेशीर ठरू शकते. परंतु ट्रम्पसारखे नेते ते अमेरिकन हिताच्या विरुद्ध मानतात. भविष्यात अॅपलला त्यांच्या उत्पादन निर्णयांमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थशास्त्र दोन्हीचा समतोल साधावा लागेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List