मुंबईत पुन्हा कोरोनाचा धोका वाढला? 53 रुग्ण मिळताच महानगरपालिका प्रशासन अलर्ट
Coronavirus Update In Mumbai: मुंबईत पुन्हा कोरोना व्हायरसने डोके वर काढले आहे. मुंबई महानगरापालिकेच्या क्षेत्रात 53 कोरोना संक्रमित रुग्ण मिळाले आहे. तसेच कोरोनाच्या संक्रमनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मृत्यू झालेल्या दोन्ही रुग्णांची प्रकृती यापूर्वीच गंभीर होती. त्यातील एकाला कर्करोगाचा आजार होता तर दुसऱ्याला नेफ्रोटिक सिंड्रोम होते. हे दोन्ही रुग्ण मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल होते.
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी विशेष बेड आणि विशेष खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभागाने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत देखरेख सुरु केली आहे. जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ पर्यंत कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी असल्याचे आढळून आले आहे. परंतु मे महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिका प्रशासन नागरिकांना घाबरू नका, परंतु काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
मुंबईतील रुग्णालयात बेड राखीव
मुंबईत कोरोनाच्या उपचारासंदर्भात सर्वोत्तम सुविधा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये २० बेड आहेत. तसेच बालरोग आणि गर्भवती महिलांसाठी २० बेड आणि ६० सामान्य बेड आहेत. कस्तुरबा रुग्णालयात अतिदक्षता विभागात २ बेड आणि १० बेडचा वॉर्ड आहे. तसेच गरज पडल्यावर या रुग्णालयामधील क्षमता वाढवली जाणार आहे.
कोरोनाचे लक्षण काय?
कोरोनाच्या सामान्य लक्षणात सर्दी, नाक वाहणे, खोकला, घसा खवखवणे, थकवा जाणावणे, डोकेदुखी यांचा समावेश आहे. यापैकी काही लक्षणे तुम्हाला जाणवत असतील आणि तुम्हाला कोरोना संसर्गाची शंका वाटत असेल तर चाचणी करून घेणे उत्तम पर्याय आहे. कोरोनाच्या गंभीर प्रकरणात श्वास घेण्यास त्रास होता. कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात, मनपा किंवा पालिका रुग्णालयात जाऊन सल्ला घेणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गाची लागण झाल्यापासून लक्षणे दिसू लागेपर्यंत साधारण पाच दिवसांचा कालावधी लागतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List