भुजबळ मंत्री होताच गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटलांना डिवचलं, पहिली प्रतिक्रिया काय?
लोकसभा निवडणुकीत राज्यात बसलेल्या धक्क्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीनं राज्यात जोरदार पुनरागमन केलं होतं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं सत्तेत आलं. राज्यात महायुतीच्या उमेदवारांचा तब्बल 232 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावलं लागलं. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्यामुळे काही जुन्या चेहऱ्यांना डावलण्यात आलं होतं. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश होता.
मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ चांगलेच नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी बोलून देखील दाखवली होती. मात्र त्यानंतर आता अखेर छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. आज छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे, यावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले सदावर्ते?
छगन भुजबळ यांना मंत्री केल्यामुळे महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. भुजबळसाहेब पुन्हा पदावर आल्याने वाडी तांड्यावर, प्रभू श्री रामांना मानणाऱ्या लोकांध्ये, भगवान बाबांना मानणाऱ्या लोकांमध्ये सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भुजबळसाहेब मंत्री झाल्यानं जनतेला समजलं आहे, हे भटक्या विमुक्तांचे सरकार आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कायद्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करू नका, भटक्या विमुक्तांना छेडण्याचा प्रयत्न करू नका, ब्राह्मण आहेत, म्हणून मुख्यमंत्र्यावर चुकीच्या पद्धतीने बोलण्याची तसदी घेऊ नका, असं गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांना म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे भुजबळ मंत्री झाल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी भुजबळांचं स्वागत केलं आहे, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, आज भुजबळ यांना न्याय मिळाला, भुजबळांच्या मंत्रिपदाचा फायदा नाशिक आणि महाराष्ट्राला होईल असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List