आरोप कसले करता? तुम्ही 60 हजार मतांनी मला दगा दिलात! नॅपकिन खांद्यावर टाकत तटकरेंनी गोगावलेंची उडवली खिल्ली
मिंध्यांच्या महाडमधील नॅपकिनवाल्या शेठची रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी चांगलीच उतरवली. विधानसभा निवडणुकीवरून माझ्यावर कसले आरोप करता? लोकसभा निवडणुकीत महाड मतदारसंघात मला अवघ्या साडेतीन हजार मतांचे मताधिक्य मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीत तुम्ही 60 हजार मतांनी निवडून आलात. मग लोकसभा निवडणुकीत तुम्ही मला दगा दिलात असे म्हणालो तर तुमची काय अवस्था होईल, असा सवालच तटकरे यांनी रोहयो मंत्री भरत गोगावले यांना केला. यावेळी त्यांनी आपल्या खांद्यावर नॅपकिन टाकून गोगावलेंची नक्कल केली आणि हात जोडून जय महाराष्ट्र केला तेव्हा महाडच्या चांदे मैदानावर जमलेल्यांनी खो खो हसत तटकरेंच्या मिमिक्रीला दाद दिली.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांची चांगलीच जुंपली आहे. अदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर गोगावले समर्थकांनी अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली. त्यामुळे अस्वस्थ असलेले सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच गोगावलेंचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून मी उभा होतो. महाड मतदारसंघात मला साडेतीन हजारांचे मताधिक्य मिळाले. महाड-पोलादपूरच्या पेट्या जशा फुटू लागल्या त्यात मी सातत्याने पिछाडीवरच होतो. यावर मी कधी नाराजी व्यक्त केली नाही. तरीही माझ्यावर ते सातत्याने टीका करत असल्याचा आरोप तटकरे यांनी गोगावले यांचे नाव न घेता केला. भाषण संपवताना तटकरेंनी खिशातून पांढरा नॅपकिन काढून उपस्थितांना दाखवला आणि तो खांद्यावर टाकून जय महाराष्ट्र करत हात जोडले.
तुम्हाला वापरायचा असेल तर ट्रेनिंग देऊ !
मी वीरेश्वराची शपथ घेऊन सांगतो की आमच्या राष्ट्रवादीची मते मी महायुतीला दिली असे तटकरे म्हणाले. मात्र तटकरेंनी केलेली नॅपकिनची मिमिक्री गोगावले यांना भलतीच झोंबली आहे. तटकरे वीरेश्वराची शपथ घेऊन बोलत असतील तर त्यांनी देवळात यावे, असे आव्हान त्यांनी दिले आणि तटकरेंना नॅपकिन वापरायची इतकीच खुमखुमी असेल तर तो कसा वापरायचा याचे टेनिंग आम्ही देऊ, असेही गोगावले म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List