छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ; अन्न व नागरी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा झाला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. छगन भुजबळांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते. अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते असतानाही सुरुवातीला छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली होती. मात्र, आता मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे.
मंत्रापदाची शपथ घेण्यापूर्वी छगन भुजबळ म्हणाले की, मंत्रीपदाबाबतचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच झाला होता. एका बैठकीतच हे निश्चित करण्यात आले होते. सोमवारऐवजी मंगळवारीच शपथविधी होईल, असे तेव्हाच ठरवण्यात आले होते. कारण मंगळवारी मंत्रीमंडळातील नेते व इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहू शकतात, त्यामुळेच हा दिवस निवडण्यात आला आहे. “ऑल इज वेल वेअर एन्ड इज वेल” , ज्याचा शेवट चांगला त्याचं सर्व चांगलं, असे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले. छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येण्याची शक्यता आहे. तिसऱ्यांदा भुजबळ यांच्याकडे या खात्याची सूत्र जाणार आहे. फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता. त्यामुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी उघडपणे आपली नाराजी अनेक वेळा व्यक्त केली होती. आगामी काळात महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्याकाळात भुजबळांना नाराज ठेवणे अजित पवार गटाला परवडणारे नाही. यामुळे भुजबळांना मंत्री करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List