शिर्डीत चार एकर जागेत मोफत पार्किंग, मंदिरालगतची गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून सुविधा
साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डीत मंदिरालगत होणारी वाहनांची गर्दी कमी व्हावी यासाठी साईनगरी शिर्डीत चार एकर जागेत नवीन पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही पार्किंगची सुविधा पूर्णपणे मोफत आहे. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात मंदिर परिसर पूर्णपणे ‘नो व्हेईकल’ झोन म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे.
नव्याने विकसित झालेल्या या मोफत पार्किंग सुविधेमुळे साईनगरी शिर्डीतील वाहतूक नियंत्रित ठेवण्यास मोठा हातभार लागणार आहे. साईबाबा हॉस्पिटल या मध्यवर्ती भागातील चार एकर जमिनीवर ही पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ठिकाणी मल्टी व्हेईकल पार्किंगचे नियोजन करण्यात येत आहे. ही पार्किंगची सुविधा मंदिरापासून जास्तीत जास्त सातशे-आठशे मीटरच्या अंतरावर आहे. विशेष म्हणजे भाविकांच्या सोयीसाठी येथून बसेससुद्धा चालवल्या जाणार आहेत. पार्किंगपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी विशेष बसेस चालवण्याचे नियोजन संस्थानने आखले आहे. चार एकरावरील या पार्किंगचे उद्घाटन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले आहे.
पार्किंगच्या नावाखाली मंदिराजवळील स्थानिक दुकानदारांकडून भाविकांची प्रचंड लूट सुरू होती. गाडी पार्किंग करण्यासाठी सुरू असणाऱ्या खासगी पार्किंगमध्ये भाविकांकडून अधिकचे पैसे घेतले जात होते. काही दुकानदार गाडी मोफत लावण्यास देत; पण त्या बदल्यात भाविकांना त्यांच्याच दुकानातून प्रसाद खरेदीची सक्ती केली जाते. आता मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध झाल्याने भाविकांची लूट थांबणार आहे. तसेच शहरातील वाहतूककोंडी कमी होणार आहे.
शिर्डी संस्थांनी सुरू केलेली पार्किंग सुविधा सद्यःस्थितीला मोकळ्या जागेत सुरू आहे. पण भविष्यात येथे मल्टिलेवल पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. मल्टिलेवल पार्किंगची सुविधा उपलब्ध झाली की मंदिर परिसर पूर्णपणे नो व्हेईकल झोन केला जाईल, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List