ठाण्यात प्राण्यांसाठी तीन स्मशानभूमी, फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही; कोपरी, कळवा, माजिवड्यात अंत्यसंस्कार
पद्धतीने दफन करण्यासाठी ठाण्यात स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात येत आहे. त्यानुसार कोपरी, कळवा आणि माजिवडा येथे महिनाभरात पाळीव व छोट्या प्राण्यांसाठी स्मशानभूमी तयार होणार आहे. त्यासोबतच जखमी किंवा आजारी प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही ठाणे पालिका लवकरच उपलब्ध करून देणार आहे.
शहरात कुत्रे, मांजर यासारख्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. अनेक घरांमध्ये या प्राण्यांचे स्थान घरातील सदस्यांइतकेच महत्त्वाचे असते. आजार, अपघात किंवा वयोमानामुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने अनेकांची अडचण होत होती, ती दूर करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. येत्या महिनाभरात पाळीव व छोट्या प्राण्यांसाठी स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. त्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर उपस्थित होत्या.
दोन कोटींचा खर्च
ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे 15 हजार पाळीव प्राणी आहेत. त्यात कुत्रे आणि मांजरांची संख्या सर्वाधिक आहे. या स्मशानभूमीसाठी प्रत्येकी सुमारे दीड ते दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठीचा निधी पंधराव्या वित्त आयोगाच्या तरतुदीतून तसेच राज्याच्या नगरविकास विभागाकडून उपलब्ध झाला आहे.
टीएमटीमध्ये सुसज्ज दवाखाना
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोपरी, कळवा आणि माजिवडा येथे मृत पाळीव प्राण्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने दफन करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचे काम सुरू आहे. यातील दाहिन्या सीएनजीवर आधारित आहेत. या दाहिन्यांची चाचणी केल्यावर त्या सुरू होणार आहेत. टीएमटीकडील वापरात नसलेल्या बसमध्ये आवश्यक बदल करून हा सुसज्ज फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List