जनतेला एकमेकांमध्ये झुंजवण्याचे काम सरकार करतेय – विजय वडेट्टीवार
जनतेला एकमेकांमध्ये झुंजवण्याचे काम हे युती शासन करत आहे. मराठ्यांना ओबीसीसोबत, धनगरांना आदिवासींसोबत झुंजवत आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचा विसर पडला आहे. केवळ जात, धर्म डोक्यात घालून माथी भडकवण्याचे काम सध्या सुरू आहे. आरक्षणाची लढाई लावली जात आहे, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला.
सांगली जिह्यातील वांगी (ता. कडेगाव) येथे माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात वडेट्टीवार बोलत होते. यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आणि आमदार डॉ. विश्वजित कदम, श्रीमती विजयमाला कदम, डॉ. अस्मिता जगताप, माजी आमदार विक्रम सावंत, स्वप्नाली कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन शांताराम कदम, महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पतंगराव कदम हे बिनधास्तपणे काम करणारे सामान्यातील असामान्य असे व्यक्तिमत्त्व होते. शिक्षण, समाजकारण अशा विविध कार्यातून त्यांनी आपली राज्यभर एक वेगळी ओळख निर्माण केली होती, असे सांगत आमदार विजय वडेट्टीवर म्हणाले, राज्याला कंगाल करण्याचे काम या महायुती सरकारने केले आहे. राज्यातील उद्योगधंदे गुजरातला हलवले जात आहेत. शासनाच्या मालकीच्या जमिनी गुजरातच्या उद्योगपतींना वाटल्या जात आहेत, या लोकांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे? असा प्रश्न उभा राहात आहे. अशावेळी आपण सर्वांनी एकत्रितपणे उभे राहून या संकटाशी मुकाबला करण्याची गरज आहे.
माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, विधानसभेत काँग्रेसचे केवळ 16 आमदार असले तरी सरकार जनतेवर अन्याय करेल किंवा चुकीचे काम करेल तर शासनाला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List