मानाच्या गणपतींचे वेळेत विसर्जन, पुण्यात निर्बंधमुक्त 34 तास 44 मिनिटे!

मानाच्या गणपतींचे वेळेत विसर्जन, पुण्यात निर्बंधमुक्त 34 तास 44 मिनिटे!

पुण्यात अकरा दिवसांनी लाडक्या बाप्पाला वैभवशाली मिरवणूक काढत वाजतगाजत, दणक्यात भावपूर्ण निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशीला (दि. 6) सकाळी 9.30 ला सुरू झालेली विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी (दि. 7) रात्री 8 वाजून 15 मिनिटांनी संपली. यंदा विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ एक तास अगोदर झाला होता. काल ढोल-ताशांचा गजर आणि दुसऱ्या दिवशी डीजेचा दणदणाट सुरू राहिला. वेळेचे बिघडलेले नियोजन, नियंत्रणाचा अभाव, कार्यकर्त्यांचा आडमुठेपणा… कोणाचा कुणाला मेळ नसल्याने मिरवणूक रेंगाळली. निर्बंधमुक्त मिरवणुकीने वेळेचा रेकॉर्ड मोडीत काढीत तब्बल 34 तास 44 मिनिटे असा नवा विक्रम प्रस्थापित केला.

पुणे पोलिसांकडून सायंकाळी 6 वाजता शेवटचा गणपती विसर्जनासाठी गेल्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात अग्निशमन दलाकडून शेवटचा गणपती 8 वाजून 15 मिनिटांनी विसर्जित करण्यात आल्याचे घोषित केले. सनई चौघडय़ाच्या सुरात सकाळी 9.30 वाजता मानाचा पहिला पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे पारंपरिक पालखीतून मंडई येथील टिळक पुतळय़ासमोर आरती झाली. पुष्पहार अर्पण करून ‘श्रीं’ची मिरवणूक निघाली. यावेळी कसबा गणपतीला पेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. पाठोपाठ मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची चांदीच्या पालखीतून वाजतगाजत मिरवणूक निघाली. गळ्यात वस्त्रमाळा घातलेली ‘श्रीं’ची मूर्ती खुलून दिसत होती. मिरवणुकीतला आई तुळजाभवानी मातेचा साकारलेला जिवंत देखावा लक्षवेधक ठरला. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमचे मिरवणुकीत आगमन होताच गुलालाची मुक्त उधळण करीत कार्यकर्त्यांनी वातावरणात रंग भरले. मिरवणूक हळूहळू पुढे सरकत होती. त्यानंतर मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे आगमन झाले. गणपती बाप्पाची भव्य मूर्ती आकर्षक पुष्परचनेत साकारलेल्या रथातून खूपच लोभस दिसत होती.

पोलिसांच्या नियोजनावर पाणी

वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी आखलेले वेळापत्रक काही प्रमाणात यशस्वी ठरले; मात्र संपूर्ण मिरवणूक नियोजित वेळेत संपवण्याचा प्रयत्न अपुरा ठरल्याचे दिसून आले. मानाचे गणपती आणि प्रमुख गणेश मंडळांनी वेळ पाळल्याने यंदा गेल्या वर्षीपेक्षा मानाच्या गणपतींचे विसर्जन लवकर झाले. मात्र, मानाच्या गणपतींच्या विसर्जनानंतर मिरवणूक लांबली. कुमठेकर, टिळक आणि केळकर रस्त्यांवरील मिरवणुका संथ गतीने पुढे सरकत राहिल्या. परिणामी, रविवारी संध्याकाळपर्यंत मिरवणूक सुरूच होती.

विसर्जन मिरवणूक उत्साहात, निर्विघ्न पार पडली. आम्ही सगळ्या मंडळांशी समन्वय साधून काम केले. मिरवणूक लवकर संपवावी, यासाठी आमचे प्रयत्न नव्हते. सर्वांना समान वेळ मिळाला पाहिजे. काही ठराविक मंडळाला जास्त आणि काहींना कमी असे होऊ नये, यासाठी प्रयत्न केले.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

दणदणाटाने त्रास

विसर्जन मार्गावर काही ठिकाणी दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली. ध्वनिवर्धक, ढोल-ताशांच्या आवाजामुळे परिसरातून चालणेदेखील अवघड झाले होते. दणदणाटामुळे रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले. विसर्जन मार्गावरून मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर काही ठिकाणी सायंकाळनंतर दणदणाट सुरू झाला.

वादावादी, बाचाबाची

अरुण मित्र मंडळाला पोलिसांनी जागेवरच थांबण्याची सूचना केली. मात्र, मंडळाचा ट्रक्टर आणि पथक जबरदस्ती बेलबाग चौकात आले.त्यावेळी टिळक पुतळ्याकडून येणारे आणखी एक मंडळ लक्ष्मी रस्त्याने सोडण्यात येणार होते. त्यामुळे दोन्ही मंडळांची मिळून एका वेळी पाच पथके चौकात आली होती. त्यामुळे गोंधळाची स्थिती झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. यात आतापर्यंत 1 ते 3 या संवर्गातील 4...
शिर्डीत चार एकर जागेत मोफत पार्किंग, मंदिरालगतची गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून सुविधा
‘कुणबी’साठी सांगली जिह्यात 14 लाख दस्तावेजांची तपासणी
कोल्हापुरात 21 तास विसर्जन सोहळा, 2700 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद
अहिल्यानगरमध्ये 14 गणपतींची 12 तास मिरवणूक
इचलकरंजीत 26 तास मिरवणूक
साताऱ्यात 15 तास विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष