Jammu Kashmir- कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार, शोधमोहीम जारी
जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी ऑपरेशन तीव्र करण्यात आले आहे. यामुळे (सोमवारी ८ सप्टेंबर ) कुलगाममध्ये शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत लष्कराचा एक जेसीओ जखमी झाला आहे. त्याच्या टीमसोबत संशयित लपण्याच्या ठिकाणाकडे जात असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. २-३ दहशतवादी लपून बसल्याचे मानले जाते. अजूनही कारवाई सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी माहिती दिली की सोमवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील गुड्डर वन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर पोलिस, लष्कराच्या ९ आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसरात शोध मोहीम सुरू केली.
या शोध मोहिमेबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, संयुक्त पथक संशयित ठिकाणाजवळ पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. ज्याला सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला आहे. ही कारवाई अजूनही सुरू आहे.
एकीकडे कुलगाममध्ये शोध मोहीम सुरू असतानाच दुसरीकडे, अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, आरएस पुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) एका पाकिस्तानी घुसखोराला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथील रहिवासी सिराज खान नावाच्या घुसखोराला रविवारी रात्री ९.२० वाजता ऑक्ट्रोई चौकीवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाहिले.
घुसखोराला आव्हान दिल्यानंतर सैनिकांनी काही गोळीबार केला, त्यानंतर त्याला सीमा कुंपणाजवळ अटक करण्यात आली. त्यांनी सांगितले की, त्याच्याकडून काही पाकिस्तानी चलनी नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरीच्या प्रयत्नामागील हेतू जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List