मराठी साहित्य संमेलनासाठी स्मरणिका संपादन समिती स्थापन
साताऱ्यात होणार असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्मरणिका संपादन समितीचे गठण करण्यात आले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ही समिती गठित केली आहे. संमेलनाच्या 99 वर्षांच्या इतिहासात प्रथमच स्मरणिका संपादन समितीमध्ये साहित्य क्षेत्रातील प्रतिनिधींबरोबरच विविध वृत्तपत्रांच्या संपादकांना संधी देण्यात आल्याची माहिती मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या 12 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर काही दिवसांपूर्वीच 99वे संमेलन साताऱ्यात होणार असल्याचे जाहीर झाले होते. संमेलनाचे नियोजन नेटके आणि वैशिष्टय़पूर्ण व्हावे यासाठी विविध समित्या तयार करण्याचे काम सुरू आहे. नुकतेच मार्गदर्शन समिती जाहीर करण्यात आली आहे. आता साहित्य संमेलन स्मरणिका संपादन समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे मुख्य समन्वयक डॉ. उमेश करंबेळकर हे असून, विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत मार्गदर्शक आहेत. समितीच्या सदस्यांमध्ये प्रथमच साहित्य क्षेत्रातील प्रतिनिधींसमवेत विविध वृत्तपत्रांच्या संपादकांना स्थान देण्यात आले आहे. या समितीच्या सदस्यांमध्ये हरीश पाटणे, राजेश सोळस्कर, हनुमंत पाटील, श्रीकांत कात्रे, मुकुंद फडके, ज्योत्स्ना कोल्हटकर, प्रा. देवानंद सोनटक्के, गजानन चेणगे, विश्वास पवार, सुनील शेडगे यांचा समावेश आहे.
स्मरणिका समितीचे गठण झाल्यानंतर रविवारी सर्व सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत पुढील आठ दिवसांत स्मरणिका कशाप्रकारची असावी, त्यात काय काय समाविष्ट असावे, त्याची रचना कशी असावी, याचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे ठरवण्यात आले. आठ दिवसांनंतर प्रारूप आराखडा तयार झाल्यानंतर समितीतील सर्वांची मते विचारात घेऊन स्मरणिकेचा आराखडा अंतिम करून त्याचे काम सुरू करण्याचेही ठरवण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List