पूर ओसरताच सांगली शहरात गाळाचे, अस्वच्छतेचे साम्राज्य
सांगलीचा पूर ओसरला, कृष्णा नदी पुन्हा पात्रात गेली. मात्र, पुरामुळे संपूर्ण शहरात गाळाचे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सांगली महापालिकेने स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर मोहीम राबवून 50 टनांहून अधिक कचरा गोळा करून विल्हेवाट लावली.
सांगली महापालिका स्वच्छता टीम सध्या पूर्ण ऍक्टिव्ह मोडवर असून, प्रशासनाकडून पूरग्रस्तांना घरात प्रवेश करण्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स्मृती पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, नीलेश देशमुख यांच्या उपस्थितीत नियोजनानुसार ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त सहदेव कावडे, अनिस मुल्ला, मुख्य स्वच्छता अधिकारी तथा सहायक आयुक्त सचिन सागावकर, नागप्पा मद्रासी यांच्यासह मुख्य स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, याकूब मद्रासी, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणिल माने, अंजली कुदळे इत्यादींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
स्वच्छतेच्या मोहिमेत सरकारी घाट, विष्णू घाट, धरण रोड, स्वामी समर्थ मंदिर परिसर, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळा रोड, ईदगाह मैदान, मिरज कृष्णा घाट, मिरज स्मशानभूमी, अमरधाम स्मशानभूमी आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर कचरा गोळा करून वाहून नेण्यात आला. मनपाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 50 टनांहून अधिक कचरा उचलून त्याची सुरक्षित विल्हेवाट लावली गेली आहे. मनपा औषध फवारणी सुरू करणार आहे. त्यामुळे पूरग्रस्तांनी घरात प्रवेश करण्यापूर्वी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. लाईट पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे का, घर कोरडे आहे का याची खात्री करूनच घरात प्रवेश करावा, असे आवाहन मनपाने केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List