‘लालबागचा राजा’चे 33 तासांनंतर विसर्जन! अत्याधुनिक तराफा, तरीही गणित चुकले… चौपाटीवर 13 तास रखडपट्टी
अकरा दिवसांच्या मनोभावे सेवेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. असंख्य गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागचा राजा’चे तब्बल 33 तासांनंतर विसर्जन झाले. गुजरातहून आणलेल्या अत्याधुनिक तराफ्याचे गणित चुकले आणि राजाला 13 तास गिरगाव चौपाटीवरच थांबावे लागले. राजाला अत्याधुनिक तराफ्यावर आरूढ करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक, कोळी बांधव आणि प्रशासकीय यंत्रणांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अखेर रात्री 9.15 च्या सुमारास राजाला तराफ्यावर विराजमान करण्यात आले आणि खोल समुद्रात नेत भक्तिभावाने निरोप देण्यात आला. लाडक्या राजाच्या रखडलेल्या विसर्जनामुळे दिवसभर भाविकांची घालमेल वाढली होती.
‘लालबागचा राजा’ शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास मंडपाबाहेर निघाला होता. लाखो आबालवृद्ध गणेशभक्तांच्या हजेरीत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. तरुणाईचा प्रचंड उत्साह, जागोजागी बाप्पाचे केले जाणारे स्वागत, पुष्पवृष्टी, गुलालाची उधळण अशा जल्लोषी वातावरणात राजाची मिरवणूक मार्गस्थ झाली होती. शनिवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मिरवणूक संथ गतीने पुढे चालली. दरवर्षी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा-सातच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचणारा ‘लालबागचा राजा’ यंदा साडेआठच्या सुमारास चौपाटीवर पोहोचला. त्यानंतर अत्याधुनिक तराफ्यावर राजाला आरुढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा तराफा पहिल्या प्रयत्नात फेल ठरला आणि राजाचे विसर्जन रखडले.
समुद्राला भरती येण्याआधी राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्याची तयारी पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र ते शक्य झाले नाही. नंतर भरती आल्याने विसर्जन रखडले. दुपारनंतर समुद्राला ओहोटी येताच राजाला नवीन तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न करण्यात आले. रात्री 9.15 च्या सुमारास त्यात यश आले आणि राजाला खोल समुद्रात नेऊन तेथे पारंपारिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. समुद्रात तराफा पाठवण्याआधी किनाऱ्यावर दरवर्षीप्रमाणे मोठय़ा उत्साहात आरती करण्यात आली आणि भक्तिभावाने राजाला निरोप देण्यात आला. अंधार असल्यामुळे विसर्जन करताना मंडळाचे कार्यकर्ते-पदाधिकारी, कोळी बांधव, पालिका आणि पोलीस कर्मचारी, स्वयंसेवक यांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. हायड्रोलिकच्या सहाय्याने राजाची मूर्ती खोल समुद्रात नेण्यात आली. राजाचा जयघोष करीत निरोप देताना गणेशभक्तांचे डोळे पाणावले.
कोटय़वधी रुपयांचा तराफा
z विसर्जनासाठी पहिल्यांदाच गुजरातमधून कोटय़वधी रुपयांचा अत्याधुनिक तराफा आणला होता. आधुनिक तराफा, हायड्रोलिक लिफ्ट, स्वयंचलित नियंत्रण प्रणाली, समुद्रातील प्रवाहानुसार स्थिर राहण्याची क्षमता, 360 अंशांमध्ये पाण्याचे फवारे उडवणारे स्प्रिंकलर आणि खास नियंत्रण प्रणाली अशी वैशिष्टय़े यात आहेत. प्रत्यक्षात विसर्जनावेळी भरती-ओहोटीच्या वेळेचे गणित चुकले आणि पहिल्या प्रयत्नात तराफा फेल ठरला.
मंडळाने व्यक्त केली दिलगिरी
z राजाचे विसर्जन रखडल्याबद्दल मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिलगिरी व्यक्त केली. लालबागचा राजा लाखो-करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पोलीस, महापालिका, माध्यमांचे आभार मानतो, असे सुधीर साळवी म्हणाले. याचवेळी त्यांनी कोळी बांधवांच्या सहकार्याबद्दलही कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. कोळी बांधव गेल्या 24 वर्षांपासून विसर्जनात सहभागी होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
वाडकर बंधूंनी व्यक्त केली नाराजी
आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षांपासून लालबागचा राजाचे विसर्जन करतो आहोत. मंडळाने यंदा गुजरातच्या तराफ्याला कंत्राट दिले. या तराफ्यावर राजाला चढवणे मुश्कील झाले. आम्ही दोन बोटींच्या सहाय्याने तराफ्यावरून राजाला खोल समुद्रात नेत होतो. नवीन तराफ्याचे गणित चुकले असे नमूद करत नाखवा हिरालाल वाडकर यांनी नाराजी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे यांनी घेतली माहिती
‘लालबागचा राजा’चे विसर्जन लांबल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि विसर्जन नेमके का रखडले याबाबत माहिती घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना काळजी घेण्याची सूचनाही केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List