पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 16 हरणांचा मृत्यू, साथीच्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज
पुणे महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामधील 16 हरणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवडाभरात एकामागून एक हरणांचा मृत्यू होत आहे. यामध्ये मादी हरणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. साथीच्या आजारामुळे या हरणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून न्याय वैद्यकीय परीक्षण अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, असे प्राणीसंग्रहालय प्रशासनाने स्पष्ट केले.
कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामध्ये शंभरहून अधिक हरणं आहेत. मागील आठवडय़ापासून सलग एक-दोन हरणांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत चितळ प्रकारातील 16 हरणे दगावली आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर हरणं दगावल्याने प्राणीसंग्रहालय प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे. मृत हरणांचे शवविच्छेदन (पोस्ट मॉर्टम) क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या पशुरोग तज्ञांनी केले आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत हरणांचे जैविक नमुने विभागीय वन्यजीव प्रशिक्षण केंद्र नागपूर, बरेली, भोपाळ आणि ओडिशा येथील भुवनेश्वर येथील नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List