चहलसोबत घटस्फोटानंतर पूर्णपणे बदललं धनश्रीचं आयुष्य; पहिल्यांदाच सोडलं मौन
कोरिओग्राफर धनश्री वर्मा आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल यांचा मार्च महिन्यात घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान धनश्रीला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पैशांसाठी तिने चहलशी लग्न केलं, अशीही टीका तिच्यावर झाली होती. आता घटस्फोटाच्या दोन महिन्यांनंतर धनश्रीने त्या सर्व गोष्टींवर मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती घटस्फोटानंतरचं आयुष्य आणि ट्रोलिंगबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत धनश्रीने पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिच्या आयुष्यात आलेल्या बदलांबद्दल बोलताना म्हणाली की, घटस्फोटानंतर ती पूर्णपणे बदलली आहे. त्याचसोबत ट्रोलिंगने कसलाच फरक पडत नसल्याचं तिने म्हटलंय. कारण तिने स्वत:ला त्या दृष्टीने अधिक मजबूत केलंय. धनश्री पुढे म्हणाली, “ट्रोलिंगने मला अजिबात त्रास होत नाही. कारण मी स्वत:ला आतून खूप मजबूत बनवलंय. मी स्वत:ला इतकं सुरक्षित ठेवलंय की बाहेरच्या गोंधळाचा मला त्रास होत नाही. मी नेहमीच एक मेहनती व्यक्ती राहिली आहे. आता मी माझ्या लाइफस्टाइलला पूर्णपणे बदललंय. मानसिक सक्षमता, शिस्त, व्यायाम आणि चांगलं अन्न यावर मी माझं लक्ष केंद्रीय करतेय. जे लोक माझ्यावर प्रेम करतात आणि माझा आदर करतात अशा लोकांसोबतच मी वावरते.”
आयुष्यातील कठीण काळाबद्दल तिने सांगितलं, “या कठीण काळात मी माझ्या भावनांना नृत्यकलेतून मांडण्याचा प्रयत्न करतेय. मला आशा आहे की मी लोकांना त्यांच्या ताकदीलाच हत्यार बनवण्यासाठी प्रेरणा दिली आहे. आत्मनिर्भरतेचं महत्त्व काय असतं, हे मी शिकले. माझ्या आईवडिलांनी एका सक्षम मुलीला मोठं केलंय. त्यामुळे माझ्यासाठी ही नवीन शिकण्याची आणि स्वत:ला अधिक मजबूत बनवण्याची वेळ आहे. मला त्यासाठी कोणालाच स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. कारण त्यावरून फक्त चर्चा होतात आणि अफवा पसरतात.”
धनश्रीने 2020 मध्ये भारतीय क्रिकेट टीमचा क्रिकेटर युजवेंद्र चहलशी लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या चार वर्षांतच या दोघांमध्ये समस्या निर्माण झाल्या होत्या. अखेर यावर्षी मार्च महिन्यात त्यांनी घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर युजवेंद्रचं नाव आरजे महवशसोबत जोडलं जातंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List