कल्याण फाटा ट्रॅफिककोंडीकडे मिंधेंच्या खासदाराचा कानाडोळा; शिवसेनेने वेधले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे लक्ष
मुंब्रा -पनवेल महामार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कल्याण फाटा ट्रॅफिककोंडीकडे मिंधेंच्या खासदाराचा कानाडोळा असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे लक्ष वेधले आहे. कायमस्वरूपी उपाय म्हणून या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कल्याण फाटा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उड्डाणपूल आवश्यक आहे. उड्डाणपुलामुळे नागरिकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचेल, तसेच वाहतुकीचा वेग वाढून जीवनमानात सुधारणा होणार आहे. केंद्र सरकारने देशभरात रस्ते विकासाचे जे व्यापक व दूरदृष्टीपूर्ण कार्य सुरू केले आहे, त्यात कल्याण फाटा येथे उड्डाणपूल प्रकल्प समाविष्ट करावा अशी मागणी कल्याण ग्रामीण विधानसभाप्रमुख रोहिदास मुंडे यांनी केली आहे. मुंडे यांनी ई-मेलद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना प्रकल्प उभारणीची विनंती केली आहे.
निधी मंजूर करावा व कामाला सुरुवात करावी
कल्याण फाटा येथे दररोज जड अवजड वाहनांची ये-जा असते. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. यासंदर्भात तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर या उड्डाणपुलासाठी निधी मंजूर करावा व कामाला सुरुवात करावी असे रोहिदास मुंडे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List