आम्ही तुमच्या सोबत, न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; उद्धव ठाकरे यांनी वैष्णवीच्या वडिलांशी साधला संवाद
वैष्णवी हगवणे या हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दोन कोटी रुपये माहेरहून आणावे यासाठी सासरच्यांकडून सतत होणारी मारहाण आणि मानसिक छळामुळे वैष्णवी शशांक हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. वैष्णवीचे कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान शुक्रवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कस्पटे कुटुंबियांचे सांत्वन केले व आम्ही तुमच्या सोबत, न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार, असा शब्द देखील दिला.
उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलताना अनिल कस्पटे यांनी माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या अशी मागणी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ”आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. तुम्हाला जे वाटतंय ते सांगा आम्ही त्याचा पाठपुरावा करून न्याय मिळवून देऊ. तुम्ही काळजी करू नका’, असे यावेळी फोनवरून सांगितले.
शिवसेनेकडून आमदार सचिन अहिर हे कस्पटे कुटुंबियांच्या भेटीला गेले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कस्पटे कुटुंबाला मदत करा व दररोज यांच्या संपर्कात रहा असे आदेश दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List