Sindhudurg News – अवकाळी पावसाचा फटका; कणकवली-आचरा राज्यमार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण
कणकवली-आचरा राज्यमार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिले आहे. अचानक मे महिन्याच्या 20 तारिखपासूनच अवकाळी पावसाने सुरुवात केल्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. परिणामी वरवडे पुलाचे काम करत असताना पुलालगत सुरू करण्यात आलेला सर्व्हिस रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे कणकवली आचरा रस्त्याची वाहतूक बंद झाली असून पर्यायी मार्गे कलमठ, कुंभारवाडी, वरवडे अशी वळवण्यात आली आहे.
कणकवली शहरातून आचऱ्याला जोडणारा वरवडे हा महत्वाचा पुल आहे. या पुलाचे काम पावसापूर्वी करुन वाहतूक सुरू करण्याची गरज होती. मात्र 20 मे पासूनच अवकाळी पावसाने जोर धरल्यामुळे आता यामार्गे वाहतूक बंद करण्यात आली आहे. या रस्त्यावर चिखलमय परिस्थिती निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. कणकवली-आचरा आणि आचरा-कणकवली प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी कलमठ बाजारपेठ येथून कुंभारवाडी मार्गे वरवडे येथून आचरा मार्गाने वाहने घेऊन जाता येतील. त्यामुळे वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे.
कणकवली आचरा रसत्यावर वरवडे येथील पुलाचे काम पावसापूर्वी पूर्ण होण्याची गरज होती. हा राज्यमार्ग असून या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. तसेच या ठिकाणी पर्यटक देखील आचरा किनाऱ्यावर या रस्त्यावरुन प्रवास करत जातात. गेले सहा महिने वरवडे येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पुलाची उभारणी केली जात आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मान्सूनपूर्व काम करुन घेण्याची जबाबदारी होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यातच अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List