आम्ही सगळे तुमच्यासोबत, उद्धव ठाकरे यांनी कस्पटे कुटुंबाला दिला धीर
वैष्णवीबाबत झालेली घटना दुर्दैवी आहे. शिवसेना परिवार तुमच्यासोबत आहे. सरकारकडे पाठपुरावा करू, काळजी करू नका, वैष्णवीला न्याय मिळवून देऊ, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. विधानसभेत आवाज उठविला जाईल. काही मदत लागली तर नक्की सांगा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी कस्पटे कुटुंबाला शुक्रवारी दूरध्वनीवरून धीर दिला.
दोन कोटी रुपये माहेरहून आणावे यासाठी सासरच्यांकडून सतत होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी वैष्णवी यांच्या आईवडिलांची वाकड येथील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांच्यासोबत दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. यावेळी कस्पटे यांनी साहेब, माझ्या मुलीला न्याय द्या, अशी विनवणी केली. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. काहीही मदत लागली तर नक्की सांगा. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी बोलणे झाले आहे. सरकारकडे पाठपुरावा करून वैष्णवीला न्याय मिळवून देऊ, अशा शब्दांत सांत्वन केले.
तुमच्या परिवारासोबत संपूर्ण शिवसेना आहे. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत याविरोधात आवाज उठविण्यात येईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले,
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List