MNS : आम्ही हिंदू आहोत पण…‘हिंदी’च्या सक्तीला मनसेचा विरोध कायम, संदीप देशपांडेंच ट्विट चर्चेत
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’ तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आता तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा शिकवली जाणार आहे. मात्र यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली असून मनसेने मात्र या निर्णयाल सख्त विरोध दर्शवला आहे. ‘ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही,’ असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनीही एक ट्विट केलं असून ते चांगलंच चर्चेत आलं आहे.
काय आहे संदीप देशपांडेंचं ट्विट ?
आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही.. असं ट्विट मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केलं असून त्यासोबत त्यांनी राज ठाकरेंचा एका फोटोही शेअर केला आहे. शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्यानंतर देशपांडेंचं हे ट्विट चर्चेत आलं आहे.राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे. मात्र हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर देशपांडे यांनीही हे ट्विट केलं असून मनसेचा हिंदीच्या सक्तीला विरोध कायम असल्याचे दिसून येत आहे.
होय,आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही pic.twitter.com/UkIIHr3OuV
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 18, 2025
मनसेकडून बॅनरबाजी
याच निर्णयाचा विरोध करत मनसेकडून शिवसेना भवनाच्या चौकातही काही बॅनर लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनीही एका पोस्टकार्डचा बॅनर त्याच भागात लावला आहे. मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांना उद्देशून लिहीलेलं हे पोस्टकार्ड बॅनर आहे.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
सुरेश भटांच्या या ओळी या पोस्टकार्ड बॅनरवर झळकत आहेत.
काय आहे प्रकरण ?
महाराष्ट्रात यंदाच्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली. या नव्या शैक्षणिक धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा शिकवली जाणार आहे. मात्र या निर्णयाला अनेकांचा विरोध असून मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘ मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही,’ असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List