सुप्रीम कोर्ट फक्त श्रीमंतांसाठी आहे का? तातडीच्या सुनावणीला न्यायालयाचा नकार
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी गुजरातमधील बांधकाम व्यावसायिकाला चांगलेच खडे बोल सुनावले. सर्वोच्च न्यायालय हे काही फक्त श्रीमंतांसाठी नाही. न्यायालय फक्त श्रीमंतांसाठी आहे का, असा प्रश्न लोकांना पडता कामा नये. आम्ही अशी परिस्थिती घडू देणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने बांधकाम व्यावसायिकाचा समाचार घेतला आणि कंपनीच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला.
गुजरातमधील वाइल्डवुड्स रिसॉर्ट्स अँड रिअॅल्टीज नावाच्या एका रिअल इस्टेट आणि खाजगी रिसॉर्ट व्यवस्थापन कंपनीने आपल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. तथापि, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने बांधकाम कंपनीची याचिका तातडीने सूचीबद्ध करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर कंपनीच्या याचिकेवर पुढील वर्षी जानेवारी 2026 मध्ये सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली.
गुजरात राज्यातील गिर राष्ट्रीय उद्यानाजवळ वाइल्डवुड्सला रिसॉर्ट उभारण्यासाठी मंजुरी देण्याबाबत हे प्रकरण आहे. राज्य वन्यजीव मंडळाने संबंधित प्रकल्प पुढे नेण्याच्या अनुषंगाने शिफारस करण्यास नकार दिला होता. त्यानंतर कंपनीने गुजरात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. गुजरात सरकारने कंपनीच्या याचिकेला विरोध केला होता. प्रस्तावित रिसॉर्ट प्रकल्प गिर वन्यजीव अभयारण्याच्या सीमेजवळ आहे, याकडे गुजरात सरकारने लक्ष वेधले होते. त्याची नोंद घेत उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि वाइल्डवुड्स रिसॉर्ट्सची याचिका फेटाळून लावली होती. त्या निर्णयाला कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List