टोकीतील शेतवस्तीवर दरोडेखोरांचा मध्यरात्री हैदोस; मारहाण करून दोन्ही भावांचे घर लुटले

टोकीतील शेतवस्तीवर दरोडेखोरांचा मध्यरात्री हैदोस; मारहाण करून दोन्ही भावांचे घर लुटले

टोकी गावातील शेतवस्तीवरील दोन भावांच्या घरांवर मंगळवारी मध्यरात्री आठ ते दहा दरोडेखोरांनी चाकू, कुन्हाडीसह दरोडा टाकला. घरातील व्यक्तींना मारहाण करून तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. विटावा येथील दरोड्याची घटना ताजी असताना एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याची दुसरी घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गंगापूर तालुक्यातील टोकी येथील कारभारी बाबुराव शेजवळ (45) व भीमराव बाबुराव शेजवळ या दोन भावांचे कुटुंब गट नंबर 9 मध्ये शेजारी शेजारी राहतात. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे कामकाज आटोपल्यानंतर सर्वजण जेवण करून झोपी गेले. कारभारी शेजवळ हे खोलीत झोपले होते. आई कडुबाई त्यांच्या खोलीत, मुलगा आदेश हा घराच्या बाहेर असलेल्या ओसरीत झोपला होता. मध्यरात्री 1 वाजता आदेशला आजी कडुबाईच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याने आजीच्या खोलीकडे धाव घेताच तोंडाला रुमाल बांधलेल्या आठ ते दहा दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे आदेशने देखील टाहो फोडला. हा आवाज ऐकून वडील कारभारी शेजवळ खोलीच्या बाहेर आले. त्यांना पाहून दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे ते खाली कोसळले. दरोडेखोरांनी चाकू, कुऱ्हाड आणि लाकडी दांड्यांचा धाक दाखवित कडुबाईच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर जखमी आदेश व कारभारी शेजवळ यांना फरफटत आईच्या खोलीत डांबून टाकले. आरडाओरड ऐकून जाग आलेल्या कारभारी यांची पत्नी वंदना, मुलगी कल्याणी या दोघेही रुमच्या बाहेर आल्या. त्यांना चाकू, कुन्हाडीचा धाक दाखवत गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. तसेच गहू विक्रीचे पैसेही लांबवले. याप्रकरणी करभारी शेजवळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भावाचेही घर लुटले

दरोडेखोरांनी कारभारी शेजवळ यांना मारहाण करून त्यांना लुटल्यानंतर त्यांना खोलीत बंद करून बाहेरून दरवाजा बंद केला होता. त्यानंतर शेजारी राहणारे भाऊ भीमराव शेजवळ यांच्या घराकडे मोर्चा वळवला. त्यांनी दरवाजा बंद केला होता. मात्र दरोडेखोरांनी त्यांच्याजवळील कटरच्या साह्याने पत्रा कापून काढला. त्यानंतर घरात जाऊन मारहाण करत सर्व ऐवज लुटला.

दरोडेखोरांनी लुटलेला मुद्देमाल

दरोडेखोरांनी शेजवळ यांच्या आई व पत्नीला जबर मारहाण करून कटरचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविले. त्यात 50 हजार रुपयांची सोन्याची पोत, 75 हजार रुपयांचे एक तोळ्याचे कानातील झुंबर, 40 हजारांची अंगठी, 30 हजार रुपयांच्या चांदीचे पाटल्या, डोरले, 50 हजार रुपये किंमतीची एक तोळ्याची सोन्याची गळ्यातील पोत, 25 हजारांची नथ, 15 हजाराच्या चांदीच्या पाटल्या, 50 हजाराची रोकड, मोबाईल असा एकूण 3 लाख 36 हजार रुपयाचा मुद्देमाल पळविला. तसेच भाऊ भीमराव शेजवळ त्यांच्या घरातून एक तोळ्याचे नेकलेस, एक तोळ्याची सोन्याची पोत, सहा ग्रॅमचे झुमके, दोन ग्रॅमची कानातील रिंग, सोन्याची नथ, पाच ग्रॅमची सोन्याची पोत, कुडके, हुजूर, चांदीचे पाच भारचे जोडवे, दहा भारच्या दोन चेन असा एकूण 2 लाख 11 हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटला. दोन्ही कुटुंबांचा एकूण 5 लाख 47हजार रुपयांचा ऐवज लांबवला.

मोबाईल फेकले पाण्यात

कारभारी शेजवळ यांच्या घरी दरोडा टाकल्यानंतर ही माहिती पोलिसांना तसेच गावकऱ्यांना कळू नये, त्यांच्या मदतीला कोणी धावून आले तर आपण पकडले जाऊ शकतो, या भीतीने दरोडेखोरांनी त्यांचे मोबाईल हिसकावून पाण्यात टाकले होते. मात्र, भीमराव शेजवळ यांना आवाजाने कुणकुण लागल्याने त्यांनी गावात याबाबत माहिती दिली. त्यामुळे दरोडेखोरांनी ‘यानेच माहिती दिली का?’ असे म्हणत पत्रे कापून घरात जाऊन दागिणे हिसकावत मारहाण केली.

तिसऱ्या दिवशी पुन्हा दरोडा

विटावा येथील दरोड्याची घटना ताजी असताना या दरोडेखोरांनी पुन्हा टोकी येथे दरोडा टाकत पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. या गुन्ह्याच्या तपासात कुठलेच धागेदोरे पोलिसांना मिळाले नाहीत, तोच आता पुन्हा टोकीत दरोडा पडला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘ठाकरे अन् पवारांचे सहा दशकांचे प्रेम’, राज-उद्धवबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? ‘ठाकरे अन् पवारांचे सहा दशकांचे प्रेम’, राज-उद्धवबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला....
WAVES फक्त समिट नाही, तर ती एक लाट आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरवोद्गार
“माणसांना रोबॉट नाही बनवायचंय, मोठी स्वप्न पाहा”; मोदींचं तरुण क्रिएटर्ससाठी काय आवाहन?
आपल्या यंग टॅलंटला मानवताविरोधी विचारांपासून वाचवलं पाहिजे; मोदींचं आवाहन
“क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड…” पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईतून नवी घोषणा
भगवान शंकराचे डमरु, श्रीकृष्णची बासरी, विष्णूचा शंख ध्वनी सकारात्मक ऊर्जा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली भारतीय संगीताची परंपरा
Mukesh Ambani: अंबानी कुटुंबातील Happy डॉगचा मृत्यू, व्हायरल होतेय भावूक पोस्ट