मला अजूनही त्या शिंगांची भीती वाटते! मुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘वर्षा’वर गृहप्रवेश अन् संजय राऊत यांचं विधान चर्चेत
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर 5 महिन्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विधिवत पूजा करून प्रवेश केला. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले.
गुरुवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले की, मुख्यमंत्री वर्षावर गेले, पण अजूनही काही पूजा राहिल्या आहेत. त्यांचे कुटुंब वर्षावर गेले असून मी त्यांना शुभेच्छा देतो. मला आशा आहे, गुवाहाटीवरून आणलेली जमिनीत पुरून ठेवलेली शिंग बाहेर काढून विसर्जित केली असतील. वर्षावर त्यांना शांत झोप लागो. त्यांच्या जीवनात सुख, शांती नादो ही अपेक्षा.
ते पुढे म्हणाले की, वर्षावर शिंग निघालीत का हे पहावे लागेल. माझ्याकडे जास्त माहिती आहे. मी चार दिवसांपूर्वी गुवाहाटीमध्ये होतो. संसदीय कामासाठी मी गुवाहाटीला गेलो होतो. तिथे अमावस्थेला मंदिरात जाऊन मी चर्चा केली. मला मिळालेली माहिती धक्कादायक आहे. त्यामुळे मला अजूनही त्या शिंगांची भीती वाटते. कारण गुवाहाटी ते वर्षा हा शिंगांचा प्रवास कसा झाला, ही शिंग नक्की कुणासाठी आणि कोणत्या पद्धतीने आणली याबाबत माझ्याकडे माहिती आहे.
दरम्यान, महायुती सरकारने 100 दिवसांच्या काळातील प्रगतीचा पाढा वाचला. यावरूनही राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. प्रगतीचा पाढा वाचणे आणि प्रगती पुस्तकावर शेरा असणे यात फरक आहे. महाराष्ट्राचा बाणा कणखर, खणखणीत, बाणेदार होता. पण गेल्या तीन वर्षात दिल्लीपुढे झुकणारा महाराष्ट्रात निर्माण झाला. हिमालयाच्या मदतीला सह्याद्रा धावला असे होर्लिंग लावतात. पण हिमालय कोण? हिमालय दिल्लीत उरलाय का? महाराष्ट्रात सह्याद्री कोण? एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्राला आलेले टेंगुळ आहे. एक टेकाड आणि दोन टेंगुळ आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचे प्रगतीपुस्तक जाहीर केले. तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांनीही अमेरिकेत 100 दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला. असे प्रगतीपुस्तक जाहीर होत राहतात. आपापसातल्या वादात महाराष्ट्र किती कमजोर झाला त्याची श्वेतपत्रिका काढा, असेही राऊत म्हणाले. तसेच 107 हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याचा तुमचा अधिकार नाही. 107 हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र यांनी खतम करून टाकला. दिल्लीपुढे झुकणारा, व्यापाऱ्यांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण केला, अशी टीकाही राऊत यांनी केली.
“सरकार मोदी की, सिस्टीम राहुल गांधी की”, जातनिहाय जनगणनेवरून संजय राऊत यांचा टोला
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असून ते एका कार्यक्रमात सहभागी होत आहेत. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, पहलगाममध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला, त्यातले 6 लोक महाराष्ट्रातील आहे. मोदींनी निदान 7 दिवस तरी दुखवटा पाळायला हवा होता. पण ते महाराष्ट्रात मनोरंजनाच्या कार्यक्रमाला येतात. 24 तारखेला बिहारमध्ये प्रचारालाही गेले आणि आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात. पहलगाममध्ये जीव गमावलेल्यांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या किंकाळ्या आमच्या कानात घुमत आहेत, हृदयात वादळ उठले आहे आणि पंतप्रधान सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमात प्रवचन देत आहेत. ही यांची देशभक्ती आहे. हे ढोंगी पाकिस्तानशी लढणार, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर वर्षा बंगल्यावर, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केला गृहप्रवेश
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List