‘सर्जिकल स्ट्राईक नको, आता थेट सर्जरीच…’, पहलगाम हल्ल्यावर भुजबळ काय म्हणाले?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे. भारताकडून सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानसोबतचा व्यापार देखील बंद आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पहलगाममध्ये जे झालं ते चुकीचं आहे, त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक वगैरे नाही तर आता सर्जरी केली पाहिजे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे, तसेच त्यांनी यावेळी संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या आठवणींना देखील उजाळा दिला.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
कैक वर्षाच्या लढाईनंतर आम्हाला हा महाराष्ट्र मिळाला आहे, या लढ्यात १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. ज्या व्यक्तीला इतिहास माहीत नाही, तो व्यक्ती स्वतःच भविष्य घडवू शकत नाही. देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भाषावार प्रांतरचना व्हावी असा निर्णय झाला, आणि जेव्हीपी कमिटीची स्थापना झाली. या मराठी भाषिकांना स्वतःचं राज्य नव्हत, संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही मराठा या वृत्तपत्रातून सुरू झाली, यांच नेतृत्व आचार्य अत्रे आणि आरडी भांडारे यांनी केलं. सका पाटील आणि मोरारजी देसाई हे त्यावेळी बोलले होते की, जोपर्यंत काँग्रेसचं सरकार आहे, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. मोरारजी देसाई यांनी फायरिंगची ऑर्डर दिली, ज्यामध्ये १०६ हुतात्म्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर अमर साबळे,सेनापती बापट हे सगळे या लढ्यात होते. प्रतापगडावर जेव्हा पंतप्रधान नेहरू आले होते, तेव्हा त्यांना लोकांनी काळे झेंडे दाखवले, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आम्ही पुरोगामी विचार काही सोडलेला नाही, आता अजित पवार यांच्यासोबत आम्ही त्याच पुरोगामी विचाराने पुढे जात आहोत, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List