WAVES 2025: 10 व्या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनचा मोठा अपघात, 6 महिने घरात बसण्याचा सल्ला पण..
अभिनेता अल्लू अर्जुन गेल्या 22 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. पुष्पा मधील त्याच्या कामाचे तर खूप कौतुक झालं. वेव्हज समिट (WAVES 2025) तो हजर होता, तेव्हा त्याने एक किस्सा सांगितला. एकदा त्याचा अपघात झाला, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला 6 महिने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे ती वेळ त्याच्यासाठी खूप खास ठरली, असं त्याने नमूद केलं.
1 मे रोजी, अल्लू अर्जुन मुंबईत झालेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज 2025) मध्ये सहभागी झाला. टीव्ही 9चे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी त्याच्याशी संवाद साधला.
6 महिने आराम करण्याचा सल्ला
अल्लू अर्जुन म्हणाला, “ मी माझ्या 10 व्या चित्रपटाचे शूटिंग करत होतो, त्यानंतर माझा अपघात झाला. माझा खांदा तुटला. मला आधी एकदा दुखापत झाली होती, एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर मी चौथ्या आठवड्यात जिमला जाऊ लागलो. यावेळीही मी तसाच विचार करत होतो, पण जेव्हा मी ऑस्ट्रेलियात डॉक्टरकडे गेलो तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की तुला 6 महिने विश्रांती घ्यावी लागेल.” असं तो म्हणाला.
या चित्रपटासाठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. कारण तेव्हा मला 2-3 महिन्यांत शूटिंग सुरू करायचे होते. त्यावेळी मला जाणवलं की शारीरिक तंदुरुस्तीव्यतिरिक्त, तुम्ही फक्त एकच गोष्ट करू शकता ती म्हणजे प्रत्येक शॉट चांगल्या प्रकारे अंमलात आणणे,असं त्याने सांगितलं.
त्यानंतर मी प्रत्येक सीनच्या वेळेस माझी स्किल्स वापरून तो उत्तम बनवायचा प्रयत्न करायचो आणि देवाच्या कृपेने, आशिर्वादाने 20 व्या चित्रपटासाठी (Pushpa) मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे तो (अल्लू अर्जुन) हा गेल्या 69 वर्षांत राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला तेलुगू अभिनेता बनला. ” जेव्हा माझा हात तुटला तेव्हा तो काळ मी माझ्या आयुष्यातील सर्वात लो फेज, वाईट काळ मानत होतो, पण तीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट होती”, असं अल्लू अर्जुन याने नमूद केलं.
दरम्यान, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा 2’ मध्ये अल्लू अर्जुनचं काम लोकांना खूप आवडलं. या चित्रपटाने जगभरात 1850 कोटी रुपये कमावले होते. आता लोक त्याच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. येत्या काळात अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पाच्या शैलीत दिसणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List