शेतीसाठीच्या आवर्तनानंतर मेअखेर मुळा धरण तळ गाठणार, आवर्तन 35 दिवस चालणार
शेतीसाठी वरदान ठरलेले मुळा धरणावरील उजव्या कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी शेवटचे आवर्तन सुटले. 35 दिवस चालणाऱ्या आवर्तनामुळे मुळा धरणात केवळ तीन टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहणार असल्याने धरण में अखेरीस तळ गाठणार, असे चित्र आहे.
मुळा धरणात सहास्थितीला साडेअकरा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, साडेचार टीएमसी मृतसाठा वगळता एकूण शेती सिंचनासाठी व पिण्यासाठी 7 टीएमसी पाणी धरणात उपलब्ध आहे. आता मुळा उजवा कालव्यावरील सुटलेले आवर्तन 35 दिवसांचे आहे. शेवटच्या आवर्तनात चार टीएमसी पाण्याचा वापर झाल्यास मुळा धरणात मे अखेरीस अल्पसाठा राहणार असून, धरण तळ गाठेल, अशी परिस्थिती आहे.
मुळा धरणावरील उजव्या कालव्याद्वारे शेती सिंचनासाठी चालू वर्षाचे उन्हाळी शेवटचे आवर्तन (दि. 27) सायंकाळी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते सोडण्यात आले. मागील वर्षी निसर्गराजाने कृपा केल्याने 26 टीएमसी असणारे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणावर राहुरी, नेवासा शेवगाव, पाथर्डी या तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी यापूर्वी दोन आवर्तने सुटली. आता सुरू झालेले उन्हाळी आवर्तन शेवटचे आहे. 35 ते 40 दिवस चालणाऱ्या आवर्तनामुळे उभ्या पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, बागायत पट्टयात उन्हाळ्यात पाणीटंचाई दूर होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शेवटच्या आवर्तनात पाटबंधारे खात्याने योग्य नियोजन केल्यास पुढील पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाण्याची जमिनीत उपलब्धता राहील, असे शेतकरी बोलतात. नेहमी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास धरणावरील उजवा व डाव्या कालव्यातून सिंचनासाठी तीन आवर्तने हमखास सुटतात. सुरू असलेल्या आवर्तनात चार टीएमसी पाणी वापर होणार असल्याने धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहून उपलब्ध साठ्यातील औद्योगिक व पिण्याचा पाणीसाठा राखीव पाहता मे अखेरीस मुळा धरण तळ गाठणार आहे. शेतीसाठीचे सुटलेले शेवटचे आवर्तन शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असून, हजारो हेक्टरवरील ऊस, मका, बाजरी, भुईमूग आदी पिकांना आवर्तनाचा फायदा होणार आहे.
मुळा उजव्या कालव्यावरील शेवटचे आवर्तन लक्षात घेता, लाभधारक शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरावेत. शिवाय उन्हाळी परिस्थितीमुळे पाणी डिमांड वाढेल. पाणी हे कालवे व चाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी खात्याकडून प्रयत्न केले जात आहेत. – रावसाहेब पवार, उपअभियंता घोडेगाव.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List