बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. यात आतापर्यंत 1 ते 3 या संवर्गातील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्यात आल्या. बदली झालेल्या या शिक्षकांच्या मेलवर त्यांच्या बदलीचे आदेश धाडले होते. मात्र, बदल्यांची प्रक्रिया झाली, तरी बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त कधी करणार, असा प्रश्न शिक्षकांसमोर असताना गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी ग्रामविकास विभागाच्या मान्यतेने बदली झालेल्या शिक्षकांना 8 सप्टेंबरनंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे जिह्यातील शिक्षकांना गणपतीबाप्पा पावल्याची भावना व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर जिह्यात गेल्या दीड महिन्यापासून शिक्षकांच्या बदल्यांची
ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत सर्वात प्रथम संवर्ग एकमधील 863 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमध्ये अपंग प्रमाणपत्र असणारे, दुर्धर आजाराने पीडित, घटस्फोटित, अपंग विद्यार्थ्यांचे पालक असणाऱ्या शिक्षकांचा समावेश असून, या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार संबंधित शिक्षकांची तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्या मार्फत पडताळणी सुरू आहे.
दरम्यान, संवर्ग दोनमध्ये 374, अवघड क्षेत्रात असणाऱ्या 388 शिक्षकांच्या आणि त्यानंतर बदली पात्र असणाऱ्या 3 हजार 95 शिक्षकांच्या आणि अशाप्रकारे आतापर्यंत 3 संवर्गातील 4 हजार 720 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, ऑनलाइन बदली झालेल्या शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्या स्तरावरून बदलीचे ऑनलाइन आदेश पाठवण्यात आले होते. बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त कधी करणार, असा प्रश्न बदली झालेल्या शिक्षकांना होता.
न्यायालयीन सुनावणी आणि अन्य कारणांमुळे बदल्यांची प्रक्रिया पार पडल्यानंतरही ग्रामविकासमध्ये बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणार की नाही, असा प्रश्न जिह्यातील शिक्षकांमध्ये होता. मात्र, या शिक्षकांना गणपती बाप्पा पावले. बदली झालेल्या सर्व शिक्षकांना 8 सप्टेंबर रोजी त्यांच्या सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणाहून कार्यमुक्त होऊन पुढील एका दिवसात बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी काढले आहेत. यामुळे जिह्यातील पावणेपाच हजार शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
निम्म्या जिह्यात होणार उलथापालथ
अहिल्यानगर जिह्यात कार्यरत असणाऱ्या एकूण प्राथमिक शिक्षकांची संख्या जवळपास 11 हजार आहे. यातील पावणेपाच हजार शिक्षकांच्या बदल्या झालेल्या असून, अद्यापि बदलीमधील एकल शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. यामुळे बदली होणाऱ्या शिक्षकांची संख्याही 5 हजार 500 पर्यंत होणार आहे. यामुळे जिह्यातील जवळपास निम्म्या शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List