कोयना जलाशयातील वाहतूक होणार सुसाट; इंधन, दुरुस्ती, पगारासाठी 78 लाखांचा निधी मंजूर
कोयना जलाशयातील दुर्गम व डोंगराळ भागातील जलवाहतुकीसाठी मागील काही काळापासून लॉँच व बार्ज यांच्या देखभाल-दुरुस्ती व इंधनावरील खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनाची मागणी प्रलंबित होती. राज्य शासनाने 78 लाख 7 हजार 282 रुपयांचा निधी वितरण करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आली आहे.
कोयना जलाशयाच्या पाणीसाठय़ामुळे बाधित झालेल्या गावांतील नागरिकांच्या दळणवळण व संपर्कासाठी 1976-77पासून तापोळा (ता. महाबळेश्वर) परिसरात जलवाहतूक सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. हा तराफा केळघर, तर्फ सोळशी, तापोळा व गाढवली दरम्यान छोटय़ा-मोठय़ा वाहनांची पाण्यातून वाहतूक करत असतो. त्यामुळे कोयना जलाशयावरील साताऱ्यातील दुर्गम व डोंगराळ भागात दळणवळणाचा कणा म्हणून तराफा वाहतूक समजली जाते. हा भाग दुर्गम असून, पर्यटक आपली वाहने तराफ्यातून घेऊन जात असतात. स्थानिक साताऱ्याला जा-ये करण्यासाठी आपली वाहने घेऊन जातात.
तापोळा येथील जलवाहतुकीसाठी सध्या कार्यरत असलेल्या 12 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागामार्फत अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार 12 कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीतील वेतन, भत्ते व मानधन अदा करण्यासाठी 44 लाख 7 हजार 282 रुपये व लॉँच बार्जेसच्या देखभाल व दुरुस्ती व इंधनासाठी ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीतील खर्च भागविण्यासाठी 34 लाख असा एकूण 78 लाख 7 हजार 282 रुपयांचा निधी पुणे विभागीय आयुक्तांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List