‘कुणबी’साठी सांगली जिह्यात 14 लाख दस्तावेजांची तपासणी
कुणबी नोंदी शोधण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाने 14 लाखांहून अधिक दस्तऐवजांची तपासणी केली आहे. सापडलेली कुणबी नोंद आपलीच असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांना वंशावळ दाखवावी लागणार आहे; अन्यथा प्रमाणपत्र मिळणे मुश्कील होणार आहे. हैदराबाद आणि सातारा गॅजेटचा दाखला देत मराठा आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुशलतेने हाताळला. मात्र, सध्या वंशावळ सिद्ध करण्यासाठी जीवाचा आटापिटा आता मराठा बांधवांना करावा लागणार आहे.
जुन्या दप्तरांमध्ये मराठा समाजासोबतच मुस्लिम, ब्राह्मण, दलित, लिंगायत आदी कुटुंबाच्या नोंदीही कुणबी म्हणून झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही तशी प्रमाणपत्रे मिळणार आहेत. अभ्यासकांच्या माहितीनुसार दक्षिण महाराष्ट्रात दोन ते तीन टक्के मराठा दाखले निघाले आहेत. वंशावळ सिद्ध करण्यासाठी तब्बल सव्वाशे वर्षांपूर्वीच्या कुणबी नोंदी आणायच्या कुठून? हा खरा प्रश्न मराठ्यांसमोर सध्या आहे. त्यामुळे सातारा व औंध गॅझेटची प्रतीक्षा आहे. सांगली जिह्यात कवठेमहांकाळ तालुक्याचा काही भाग व तासगाव, कडेगाव, पलूस, शिराळा, वाळवा, शिराळा, खानापूर, आटपाडी तालुक्यात कुणबी नोंदी उपलब्ध आहेत. तेथील बऱ्याच गावांचे 1860 नंतरचे दप्तर मिळते. मिरज तालुक्याचे मात्र 1880 पूर्वीचे रेकॉर्ड अगदी क्वचित उपलब्ध आहे. साधारणतः 1915 ते 1920 नंतर कुणबी नोंदी थांबल्या.
मोडीतील नोंदी आणि त्या वाचनातील संदिग्धता यामुळे अनेक नावे जुळत नाहीत. दाखले मिळण्यात अडचणी येणार आहेत. नोंद मिळाली तरी संबंधित व्यक्ती आपला पूर्वज होता, हे सिद्ध करणे मोठे दिव्य आहे. सरासरी 1880 ते 1920 दरम्यानची ही व्यक्ती म्हणजे खापर पंजोबा असू शकतो. मिरज तालुक्यात संस्थानी मुलुख असल्याने कुणबी नोंदी झाल्याच नाहीत. तालुक्याचे रेकॉर्ड 1880 ते 90 किंवा 1910 नंतरचे मिळते. पण कुणबीसाठी त्याच्याही मागे जावे लागणार आहे. सांगली जिह्यात 1920 नंतर कुणबी दाखले आढळत नाहीत. शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी अशी गणना असली तरी काही कुटुंबात मोठा भाऊ कुणबी तर लहान भाऊ मराठा अशाही नोंदी आहेत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रासाठी यापुढे वंशावळ सिद्ध करण्याचे मोठे आव्हान मराठा समाजासमोर असणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List