कोल्हापुरात 21 तास विसर्जन सोहळा, 2700 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद
पारंपरिक वाद्यांसह साऊंड सिस्टीमचा दणदणाट, विद्युत रोषणाईचा झगमगाट, डीजेच्या रिमिक्सवर थिरकणारी हजारो पावले आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर अशा जल्लोषी वातावरणात अनंत चतुर्दशी दिवशी कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा निर्विघ्न व शांततेत संपन्न झाला. तब्बल 21 तास विसर्जन मिरवणुकीसाठी लागले. शहरात इराणी आणि परिसरात 2700हून अधिक लहान-मोठ्या गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाले.
सकाळी मिरवणूक सुरू झाल्यानंतर सुरू असलेल्या पारंपरिक वाद्यांसह साऊंड सिस्टिमचा दणदणाट यंदाही मध्यरात्री बाराच्या ठोक्याला बंद झाला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील शेवटच्या गणपतीची पापाची तिकटी येथे शेवटची आरती पहाटे साडेचारच्या सुमारास होऊन विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. शेवटच्या मूर्तीचे विसर्जन सकाळी नऊच्या सुमारास झाले. पावसाने उघडीप दिल्याने तसेच रात्री हवेत असलेल्या काहीशा गारठ्यामुळे भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. महानगरपालिका, पोलीस यंत्रणेसह व्हाईट आर्मी, पोलीस मित्र, वैद्यकीय पथक आदींनी अहोरात्र परिश्रम घेतले.
मिरजकर तिकटी येथून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. तत्पूर्वी खासबाग मैदान परिसरात मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’च्या पूजनाने मिरवणुकीला सकाळी नऊच्या सुमारास सुरुवात झाली. खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आदींच्या हस्ते ‘श्रीं’चे पूजन झाले. यावेळी संस्था संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीच्या सुरुवातीस ढोल-ताशा पथकाने परिसर दणाणून सोडत वातावरणात उत्साह निर्माण केला होता. यानंतर फुलांनी सजविलेल्या पालखीचे मान्यवरांनी मिरजकर तिकटीपर्यंत सारथ्य केले. त्यानंतर महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश मार्गे, इराणी खण अशा मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणूक मार्गात अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांनी मंडप उभारून गणेश मंडळांना सुपारी-नारळ देत शुभेच्छा दिल्या.
मागील काही वर्षांपासून प्रशासनाने कर्णकर्कश साऊंड सिस्टीमवर मर्यादा घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. प्रशासनाने कणखर भूमिका घेतल्याने दरवर्षी डीजेवर धिंगाणा घालणाऱ्या मोजक्या मंडळांना यंदाही सपशेल माघार घ्यावी लागली. धोकादायक लेझर किरणांवर प्रशासनाने बंदी घातल्याने मंडळांनी लेझरला फाटा दिला. नेत्रदीपक रोषणाईच्या साथीला, ढोल पथकांची लयबद्ध निनाद, ऑर्केस्ट्रा, लेझीम-पथके, ढोल-ताशे, झांजपथक ही यंदाच्या मिरवणुकीची ठळक वैशिष्ट्ये ठरली. सहकुटूंब लोकांनी मिरवणुकीचा आनंद लुटला. संध्याकाळी सहापर्यंत मिरवणूक मार्गावर पारंपरिक वाद्यांचा गजर होता.
सायंकाळनंतर डीजेच्या दणदणाटाने मिरवणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. डीजेच्या मोठ्या आवाजावर बेभान होऊन तरुणाई नाचत होती. रात्री नऊच्या सुमारास मुख्य महाद्वार रोड मिरवणूक मार्गावर तुफान गर्दी झाली. यातच मिरवणूक रेंगाळली. हुल्लडबाजीचा प्रकार रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शहरासह उपनगरांतील सर्व साउंड सिस्टिम बंद झाल्या. दरम्यान, काही रेंगाळणाऱ्या मंडळांना पोलिसांनी खाक्या दाखवला. परिणामी तुलनेत सुमारे तीन ते पाच तास अगोदरच मिरवणूक संपली.
पापाची तिकटी येथे क्रांतिवीर भगतसिंग व व्हाईट आर्मी रेस्क्यू फ्रेंड सर्कल या मंडळांच्या शेवटची गणपतीची आरती पहाटे 4.45 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते झाली. तसेच मिरवणूक मार्गावरून येणाऱ्या प्रतिभानगर येथील राजर्षी शाहू महाराज फ्रेण्ड मंडळांची शेवटची गणेशमूर्ती सकाळी 9 वाजता इराणी खण येथे विसर्जनासाठी आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
पर्यावरणपूरकला उत्स्फूर्त प्रतिसाद
महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सार्वजनिक मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे 21 तास चाललेल्या विसर्जन सोहळ्यात महापालिकेला अर्पण केलेल्या आणि सार्वजनिक मंडळांनी विसर्जित केलेल्या मोठ्या 1,561 व 1203 लहान गणेशमूर्ती, अशा 2 हजार 764 गणेशमूर्ती इराणी खण येथे पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या. विसर्जनावेळी शहरात 22 ठिकाणी महापालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. पंचगंगा नदी घाटावर 1 हजार 144 लहान-मोठ्या मूर्ती संकलित करण्यात आल्या. शिवाय 35 टन निर्माल्य संकलन करण्यात आले.
मनपा यंत्रणा 25 तास राबली
महापालिकेकडून विसर्जन ठिकाणी व विसर्जन मार्गावर सर्व यंत्रणा 25 तासांहून अधिक काळ राबली. विसर्जनापूर्वी मिरवणूक मार्गांवरील रस्त्यांची डागडूजी, अतिक्रमण व इतर अडथळे हटविण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड अशा आवश्यक साधनसामग्रीसह तैनात करण्यात आले होती. सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी इराणी खणीवर चार क्रेन व 10 फ्लोटिंग तराफ्यांची सोय करण्यात आली होती. विसर्जनाच्या कामकाजाकरिता पवडी, आरोग्य, उद्यान व इतर विभागांचे सुमारे तीन हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. तसेच 100 टेम्पो, 415 हमाल, 5 जेसीबी, 7 डंपर, 4 पाणी टँकर, 2 बूम, 6 अॅम्ब्युलन्स व इतर यंत्रणा होती.
दहा ट्रक्टर चपलांचा ढीग
शहारातील मिरवणूक संपल्यानंतर महापालिकेच्या वतीने मुख्य मिरवणूक मार्गांची साफसफाई करण्यात आली. यामध्ये बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर, गंगावेश, रंकाळा वेश, रंकाळा टॉवर, जुना वाशी नाका व इराणी खण या मुख्य मार्गांवरील तब्बल 10 ट्रॉलीपेक्षा जास्त चपलांचा ढीग व इतर कचऱ्याचा युद्धपातळीवर आरोग्य विभागाच्या वतीने उठाव करण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List