पहिला धारावीतला व्यवसाय कुठे जाणार ते सांगा मग तुमचा धंदा करा, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज धारावीतल्या कुंभारवाड्यातील नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुंभारवाड्यातील गल्ल्यांमध्ये फिरून तेथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी ‘धारावीतला व्यवसाय कुठे जाणार ते सांगा मग तुमचा धंदा करा’, असे अदानी व सरकारला ठणकावले आहे.
”आज मी घरोघरी जाण्याचा प्रयत्न केला. अनेक गल्ल्यांमध्ये फिरलो. या गल्ल्या मला नवीन नाहीत. धारावी म्हणजे नक्की काय आहे? अनेकांना वाटतं की धारावी ही झोपडपट्टी आहे. पण मी सगळ्यांना सांगत असतो की धारावी हीझोपडपट्टी नाही तर हा मुंबईचा जीव आहे. आता येताना वेगवेगळ्या समाजातील लोकांना भेटलो. वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकं आली आहेत. चार पाच पिढ्यांपासून इथे राहत आहेत. इथे आपली ओळख एकच आहे. धारावी व मुंबई ही ओळख व एकीची ताकद आहे. ही धारावी मुंबईचा जीव आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. धारावीत लोकांची घरं कच्ची असतील पण मुंबईचा विकास यांच्यामुळे पक्का झालाय, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
”मुंबईची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईचं महत्त्व कमी करणे म्हणजे आपल्या सर्वांच महत्त्व कमी करणे आहे. मुंबईतून व्यवसाय पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपली जी ताकद आहे, आपला जो व्यवसाय आहे, आपली जी मेहनत आहे, आपण जे घाम गाळून कमवतो ते कुठेही कमी होता कामा नये यासाठी आपण लढतोय. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. पण विकास सर्वप्रथम आपला झाला पाहिजे आणि नंतर दुसऱ्या कुणाचा. आताचा जो काही प्लॅन बघतोय त्यावरून असं आम्हाला दिसतंय की तुम्हाला देवनार डंम्पिंग ग्राऊंडला पाठवणार. आमची मागणी हिच आहे की तुम्हाला इथेच घरं मिळालं पाहिजे, तुमचा व्यवसाय जसाच्या तसा राहिला पाहिजे. त्यासाठी चांगली जागा द्या तरच आम्ही ऐकू. या आमच्या स्पष्ट मागण्या आहेत. अदानी या व्यक्तीला माझा विरोध नाही. विकास कुणीही करावा. मुंबई लुटून तुम्हाला मी श्रीमंत होऊ देणार नाही. मुंबईचा विकास करा आणि श्रीमंत व्हा मला काही हरकत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.
”काही दिवसांपूर्वी मेघवाडीत सर्व्हे झाला. तिथले लोकं सांगत होते की ते शंभर वर्षापासून तिथे राहत आहेत. तिथल्या 80 टक्के लोकांना अपात्र केलं आहे. ती लोकं जाणार कुठे, राहणार कुठे? कुंभारवाड्यातले सर्व कलाकार आहेत. ते कोणत्याही जाती धर्माचे असो त्यांच्यावर अन्याय मी सहन करणार नाही. जात पात धर्म काहीही असो मुंबईकरांवरील अन्याय मी सहन करणार नाही. कुणाचं घर सहा फुटाचं नाही म्हणून अपात्र आहे. हे चालणार नाही. सरकारला मी हाच इशारा देतोय की इथे रक्ताची नाती एकत्र राहत आहेत. तुम्ही त्यांना वेगळं करू शकत नाही. प्रत्येकाला घर मिळालंच पाहिजे. इथे तुम्ही येताय तर इथल्या प्रत्येकाला मानसन्मान देऊन या रक्त सांडायला देऊ नका, आम्ही लढायला तयार आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.
”इथे जे कुंभारवाडे आहेत, ते कुठे जाणार. तुमचे व्यवसाय चाळीस मजल्याच्या इमारतीत जाऊ शकत नाही. तर हा व्यवसाय कुठे जाणार? माती कुठे ठेवणार, मडकी कुठे सुकवणा, कुंभारवाडे कुठे जाणार? त्याचं प्रेझेंटेशन द्या जर तुमचं प्रेझेंटेशन धारावीकरांना मान्य असेल तर आम्हाला मान्य असेल नाहीतर मान्य करणार नाही. पहिला धारावीतल व्यवसाय कुठे जाणार ते सांगा मग तुमचा धंदा करा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List