हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी, भूस्खलनात 3 जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये ढगफुटीमुळे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. भूस्खलनामुळे मोठा मातीचा ढिगारा कोसळला आहे. यात सुमारे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलच्या अनेक भागात नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंडीचे डीसी अपूर्व देवगण यांनी माहिती दिली आहे की, जेल रोडजवळील परिसरात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनामुळे जवळपास 50 पेक्षा जास्त गाड्या ढिगाऱ्याखाली गेल्या आहेत.
पावसामुळे मंडी शहराचे खूप नुकसान झाले आहे. रात्रभर मुसळधार पाऊस पडत असल्याने, मंडीमध्ये पहाटे 3.30 ते 4.00 च्या भूस्खलन झाले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 3 मृतदेह सापडले आहेत आणि एक व्यक्ती बेपत्ता आहे. एनडीआरएफ पथके येथे पोहोचली आहेत. मदतकार्य सुरू करण्यात आलेले आहे. मंडीमध्ये झालेल्या विध्वंसामुळे सर्वाधिक नुकसान जेल रोड, झोनल हॉस्पिटल मार्ग आणि सैन परिसरात झाले आहे. किरतपूर मनाली चार पदरी आणि पठाणकोट मंडी राष्ट्रीय महामार्ग भूस्खलनामुळे बंद झाला आहे.
विध्वंसाच्या वेळी अनेक नागरीक घटनास्थळी उपस्थित होते. भूस्खलन होताना नागरीकांनी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावण्यास सुरुवात केली. काही लोक दुकानांमध्ये घुसले तर काहींनी जवळच्या घरांमध्ये आश्रय घेतला.
शिमला हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत सर्वाधिक पाऊस मंडी जिल्ह्यात 198.6 मिमी पाऊस पडला. प्रशासनाने भूस्खलनाच्या शक्यता असलेल्या भागात जाऊ नये आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मंडी उपविभाग सदरमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंडीच्या एसडीएम रुपिंदर कौर यांनी (29 जुलै) परिसरातील सर्व शाळा, डीआयईटी, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
एसडीएमने आदेशात स्पष्ट केले आहे की, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 34 (अ) अंतर्गत त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करताना विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List