हिंदुस्थानची विमाने पाकिस्तानने पाडली काय?‘ऑपरेशन सिंदूर’वरून लोकसभेत घमासान… विरोधकांनी सरकारला घेरले!
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चे दरम्यान लोकसभेत आज विरोधकांनी सरकारला अक्षरशः खिंडीत गाठले. युद्ध का थांबवले? हिंदुस्थानचे किती नुकसान झाले? पाकिस्तानने आपली विमाने पडली का? अशा प्रश्नांच्या फैरीच विरोधकांनी सरकारवर झाडल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेत सहभागी होताना या प्रश्नांची थेट आणि स्पष्ट उत्तरे देणे टाळले. ‘‘परीक्षेचा अंतिम निकाल महत्त्वाचा असतो. परीक्षा देताना किती पेन तुटले आणि किती पेन्सिली हरवल्या याची पर्वा करायची नसते,’’ अशी डायलॉगबाजी त्यांनी केली. मात्र विरोधकांनी मुद्दे लावून धरत लोकसभा दणाणून सोडली.
‘इंडिया’ आघाडीच्या प्रचंड दबावापुढे झुकलेल्या मोदी सरकारने आज संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चेला सुरुवात केली. चर्चेच्या पहिल्याच दिवशी प्रचंड घमासान झाले. काँग्रेसचे गौरव गोगोई, दीपेंदरसिंह हुड्डा, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत, तृणमूलचे कल्याण बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे रमाशंकर राजभर यांच्यासह अनेकांनी प्रश्नांचे बाण सोडून सरकारला हैराण करून सोडले. गौरव गोगोई यांनी सीडीएस अनिल चौहान यांच्या वक्तव्याचा हवाला देत पाकिस्तानने आपली किती जेट विमाने पाडली, अशी विचारणा केली. ‘‘हिंदुस्थानकडे फक्त 35 जेट विमाने आहेत. त्यातील काही पडली असतील तर हे देशाचे मोठे नुकसान आहे. नेमक्या काय चुका झाल्या, ही सगळी माहिती समोर यायला हवी,’’ असे गोगोई म्हणाले.
उत्तर देण्याऐवजी विरोधकांनाच दोष
राजनाथ यांनी निवेदन करताना विमान पडल्याची संख्या सांगणे टाळले. ‘‘ध्येय मोठे असले की छोटय़ा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे असते. छोटय़ा गोष्टींकडे लक्ष दिल्यास देशाच्या सुरक्षेसारखे महत्त्वाचे मुद्दे बाजूला पडण्याची भीती असते,’’ असे ते म्हणाले. प्रश्न विचारत असल्याबद्दल त्यांनी विरोधकांनाच दोष दिला. हिंदुस्थानने शत्रूची किती विमाने पडली हे विरोधकांनी विचारायला हवे, असे राजनाथ म्हणाले. हिंदुस्थानचा एकही सैनिक शहीद झाला नसल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
आम्ही सैन्याचे ढोल वाजवणार, सरकारचे नाही!
ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाले म्हणत असाल तर त्यात तुमचे शौर्य काय आहे? असा सवाल करतानाच, संकट काळात सरकारसोबत राहण्याची आमची भूमिका आहे, याचा अर्थ आम्ही सरकारचे आणि पंतप्रधानांचे ढोल वाजवणार नाही, आमच्या सैन्याचे ढोल वाजवू. जे काही शौर्य गाजवले आहे ते सैन्याने गाजवले आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी आज सरकारला ठणकावले.
आतंकवाद्यांना ‘शहीद’, मसूद अजहरला ‘साहेब’ केले!
केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह यांनी आज लोकसभेत सर्वांनाच धक्का दिला. ऑपरेशन ‘सिंदूर’च्या चर्चेवर बोलताना लल्लन सिंह हे आतंकवाद्यांना ‘शहीद’ म्हणाले. तर, दहशतवादी मसूद अजहरचा उल्लेख ‘साहेब’ असा केला. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे.
ट्रम्पसमोर तुमची 56 ची छाती 36 इंचांची का होते?
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत भाग घेताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवला. ऑपरेशन सिंदूर मीच थांबवले, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अद्यापही त्यांना उत्तर का दिले नाही, ट्रम्प खोटारडे आहेत असे मोदी का बोलले नाहीत. ट्रम्प समोर येताच मोदींची उंची 5 फुटांची का होते? ट्रम्प यांना पाहून मोदींची 56 इंची छाती 36 इंचांची कशी होते? अमेरिकेच्या अध्यक्षांना आपले पंतप्रधान इतके का घाबरतात,’ असा बोचरा सवाल बॅनर्जी यांनी केला.
खरा विश्वगुरू व्हाइट हाऊसमध्ये
ऑपरेशन सिंदूर मीच थांबवले हा ट्रम्प यांचा दावा खरा असेल तर मग आपले सरकार कुठे होते? खरा विश्वगुरू व्हाइट हाऊसमध्ये बसला आहे, असा सणसणीत टोला समाजवादी पक्षाचे खासदार रमाशंकर राजभर यांनी हाणला.
तुम्ही युद्ध का थांबवलं?
तुम्ही युद्ध का थांबवलं… विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विचारलेल्या या एका प्रश्नामुळे लोकसभेत गदारोळ झाला. राजनाथ सिंह निवेदन देत असताना हा राडा झाला. हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानचे काही हवाई तळ उद्ध्वस्त केल्यामुळे पाकिस्तान घाबरला होता. पराभव मान्य करत त्यांनी शस्त्रसंधीसाठी गयावया केली. लष्करी पातळीवर चर्चा झाली. त्यानंतर… राजनाथ यांनी हे सांगताच अचानक राहुल उठले… पण तुम्ही त्यांची विनंती मान्य का केली? तुम्ही का थांबलात? असा प्रश्न केला. हा प्रश्न सत्ताधारी सदस्यांना झोंबला आणि त्यांनी गोंधळ घातला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List