पहलगाम हल्ला ही सुरक्षेतील चूकच! राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या कबुलीमुळे मोदी सरकारची पंचाईत
‘पहलगामचा दहशतवादी हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेतील चूक होती. या चुकीमुळेच हा भयंकर हल्ला झाला’, अशी कबुली जम्मू-कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज दिली. राज्याचे घटनात्मक प्रमुख या नात्याने त्यांनी या घटनेची र्प्णू जबाबदारीही घेतली. त्यांच्या या कबुली जबाबामुळे केंद्रातील मोदी सरकारची पंचाईत झाली आहे.
‘पहलगाममध्ये जे झाले ते अत्यंत दुर्दैवी होते. निरपराध लोक नाहक मारले गेले. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळेच हे घडले यात दुमत असण्याचे कारण नाही. मी त्याची पूर्ण जबाबदारी घेतो. जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हे पर्यटकांना लक्ष्य करत नाहीत असा एक सर्वसाधारण समज होता. तो समज चुकीचा ठरला. शिवाय जिथे हल्ला झाला ते मोकळे मैदान होते. तिथे सुरक्षा दलातील जवानांच्या तैनातीसाठी किंवा राहण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती, असे सिन्हा म्हणाले. ‘हा हल्ला पाकपुरस्कृत होता. एनआयएच्या आतापर्यंतच्या तपासानुसार स्थानिकांचा यात सहभाग असल्याचे संकेत मिळाले आहेत.
दहशतवाद्यांची ओळख पटलीय, पण…
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटलेली आहे, मात्र अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. तपास संस्था त्यांच्या मागावर आहेत. लवकरच या हल्लेखोरांना अटक केली जाईल, असा विश्वास सिन्हा यांनी व्यक्त केला.
सत्यपाल मलिक यांनीही दिला होता केंद्राला धक्का
जम्मू-कश्मीरचे याआधीचे नायब राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यामुळेदेखील मोदी सरकार अडचणीत आले होते. जम्मू-कश्मीरमधील किरू हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाच्या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मलिक यांनी हे टेंडर रद्द केले होते. त्याची माहिती पंतप्रधानांनाही दिली होती. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर ते टेंडर दुसऱ्याच्या सहीने मंजूर करण्यात आले. त्यावरून मलिक यांनी भाजपच्या काही लोकांवर आरोप केले होते.
विरोधक म्हणतात, राजीनामा द्या!
एप्रिल महिन्यात पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता, त्यात 26 पर्यटक मारले गेले. या हल्ल्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला गेला. कश्मीरमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे सांगणाऱया मोदी सरकारला विरोधकांनी धारेवर धरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे अधिवेशन बोलवून हा हल्ला कसा झाला व ‘ऑपरेशन सिंदूर’ने नेमके काय साध्य झाले यावर निवेदन द्यावे, अशी मागणी केली, मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले होते.
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सकडून राजीनाम्याची मागणी
सिन्हा यांनी चुकीची कबुली दिल्यानंतर काँग्रेस व कश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने सिन्हा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘मोदी सरकारमधील काही लोक थेट जम्मू-कश्मीरमधील कायदा-सुव्यवस्था व सुरक्षेची जबाबदारी पाहत होते. सिन्हा हे हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून त्यांचा बचाव करत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List