बुद्धिबळाची नवी विश्वविजेती, महाराष्ट्राची दिव्या देशमुख 64 घरांची सम्राज्ञी
महाराष्ट्रकन्या दिव्या देशमुख 64 घरांची सम्राज्ञी झाली. 19 वर्षीय दिव्याने महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेतेपद पटकावत जॉर्जियातील बाटुमी शहरात नवा इतिहास लिहिला. नागपूरच्या या मराठमोळ्या लेकीने आपल्याहून सरस मानांकन असलेल्या अन् प्रचंड अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेल्या आपल्याच देशाच्या कोनेरू हम्पी हिचा टायब्रेकपर्यंत ताणलेल्या लढतीत 2.5-1.5 गुणफरकाने पराभव करून जगज्जेतेपदावर मोहोर उमटविली. दिव्या देशमुख ही जगज्जेतेपदावर नाव कोरणारी पहिलीच हिंदुस्थानी महिला खेळाडू ठरली हे विशेष! हिंदुस्थानच्या या उभय खेळाडूंमध्ये क्लासिकल डावात बरोबरी झाली होती. मात्र टायब्रेकमध्ये दिव्याने आक्रमक आणि आत्मविश्वासाने खेळ करत हम्पीला हरविले आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
ज्या वयात अनेकजण आपल्या करिअरचं पहिलं पाऊल टाकत असतात, त्या वयात महाराष्ट्राच्या लेकीने, दिव्या देशमुखने दिव्य पराक्रम रचत महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे अजिंक्यपद पटकावले. ती फक्त जिंकली नाही, तर तिने आपल्या वयापेक्षा अधिक अनुभव असलेल्या अनुभवी ग्रॅण्डमास्टर कोनेरू हम्पीचा टायब्रेकरपर्यंत ताणलेल्या लढतीत 2.5-1.5 असा पराभव केला आणि आपणच पटावरची नवी झुंजार राणी असल्याचे जगाला दाखवून दिले. या यशामुळे दिव्या हिंदुस्थानची 88वी ग्रॅण्डमास्टरही झालीय.
टायब्रेकमधील थरार
टायब्रेकच्या पहिल्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना दिव्याची दमछाक झाली होती. मात्र, हम्पीच्या एका चुकलेल्या चालीमुळे दिव्याने तिचा वजीर मिळवून सामन्यावर पकड मिळविली; पण डाव बरोबरीत सुटला. टायब्रेकच्या दुसऱ्या डावात दिव्याने काळय़ा मोहऱ्यांनी खेळताना सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत आठ मिनिटांची आघाडी मिळविली आणि सामन्यावर वर्चस्व गाजविले. सामन्यात एक क्षण असा आला होता, जेथे हम्पीकडे पुन्हा सामन्यात परतण्याची संधी होती. मात्र, ती त्या संधीचे रूपांतर विजयात करू शकली नाही. अखेरच्या क्षणी तिने चांगला प्रयत्न केला; पण निर्णायक क्षणी हम्पीकडून चूक झाली अन् दिव्याने संधी साधत अत्यंत हुशारीने आणि आत्मविश्वासाने खेळ करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब करीत ऐतिहासिक कामगिरी केली.
दिव्याचा प्रेरणादायी प्रवास
इंटरनॅशनल मास्टर असलेल्या दिव्या देशमुखचा या स्पर्धेतील प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला. तिने अंतिम 16व्या फेरीत पाचव्या मानांकित चीनच्या झू जिनरचा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत तिने आपल्याच देशातील अनुभवी हरिका द्रोणावल्लीला नमविले. उपांत्य फेरीत तिने तृतीय मानांकित व माजी जगज्जेती असलेल्या चीनच्या तान झोंगयी हिचा पराभव केला. या साऱया सामन्यांमध्ये दिव्याने दडपणातही मोठय़ा आत्मविश्वासाने खेळण्याची असामान्य क्षमता दाखवून दिली.
दिव्याला 42 लाखांचे इनाम
महिला विश्वचषक जिंकणाऱया दिव्या देशमुखला जगज्जेतेपदाबरोबरच 42 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले, तर उपविजेती कोनेरू हम्पी 35000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 30 लाख रुपये बक्षिसाची मानकरी ठरली. या दोन्ही खेळाडूंनी आगामी वर्षी होणाऱया बुद्धिबळातील अत्यंत प्रतिष्ठेच्या पॅण्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.
आईच्या खांद्यावर अश्रूंचा बांध फुटला
दिव्याच्या यशात आईचा सिंहाचा वाटा आहे. तिच्या प्रत्येक दौऱयावर आईच असते. आज जिंकल्यानंतरही तिने आपल्या आईला घट्ट मिठी मारली आणि मग तिच्या अश्रूंचा बांध आईच्या खांद्यावर फुटला. हे तिचे आनंदाश्रू, विजयाश्रू होते, जे तिला जगज्जेती झाल्यानंतर एक क्षणही लपवता आले नाहीत. दुसरीकडे, जगज्जेतेपद थोडक्यात हातातून निसटल्याने कोनेरू हम्पीच्याही डोळय़ांच्या कडा ओलावल्या. तिनेही अश्रूंना वाट करीत दिव्याचे अभिनंदन केले.
ग्रॅण्डमास्टर दिव्या देशमुख
ग्रॅण्डमास्टरचा एकही नॉर्म न मिळालेल्या दिव्याने या स्पर्धेत दिव्य कामगिरी करताना ‘क्वीन ऑफ चेस’चा बहुमान संपादला आणि त्याचबरोबर ग्रॅण्डमास्टर हा किताबही. ती हिंदुस्थानची 88 वी ग्रॅण्डमास्टर ठरली असून कोनेरू हम्पी (2002), हरिका द्रोणावली (2011), वैशाली रमेशबाबू (2024) या तिघींनाच महिला ग्रॅण्डमास्टर होता आले होते, तर आता दिव्या चौथी ग्रॅण्डमास्टर ठरली आहे. त्याचबरोबर ती महाराष्ट्राची पहिलीच महिला ग्रॅण्डमास्टर ठरली आहे. महाराष्ट्राकडून आतापर्यंत 15 खेळाडूंना ग्रॅण्डमास्टरचा किताब पटकावता आला आहे.
दिव्यावर अभिनंदनाचा वर्षाव
दिव्या देशमुखच्या या ऐतिहासिक यशाचा देशाला अभिमान आहे. तिच्या चिकाटी आणि निश्चयामुळे ती आज जगज्जेती झाली आहे. तिच्या या कामगिरीने देशातील अनेक होतकरू बुद्धिबळपटूंना नवी प्रेरणा मिळेल. – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नागपूरच्या दिव्याने संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिची साहसी खेळी, अचूक रणनीती आणि सातत्य यामुळे ती खरंच ‘चेस क्वीन’ ठरली आहे. महाराष्ट्राच्या या मुलीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘दिव्याचा विजय संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण आहे. आपल्या अथक प्रयत्नांमुळे ती जागतिक स्तरावर पोहोचली आहे. तिचे हार्दिक अभिनंदन!’ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
‘दिव्याची खेळी अतिशय आक्रमक, आत्मविश्वासपूर्ण होती. तिच्या वयाच्या मानाने ही कामगिरी अभूतपूर्व आहे. ती भविष्यात महिलांच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करत अनेक विजय मिळवेल यात शंका नाही.’ – प्रवीण ठिपसे
‘दिव्याचा विजय म्हणजे हिंदुस्थानी बुद्धिबळ क्षेत्राचा उत्सवच. तिचा खेळ शांत पण प्रभावी आहे. ती हिंदुस्थानी बुद्धिबळाच्या नव्या युगाची सुरुवात करत आहे.’ – विश्वनाथन आनंद
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List