Operation Sindoor Debate – गृहमंत्री माझ्या आईच्या अश्रूंवर बोलले, पण युद्धविराम का केला? याचे उत्तर दिले नाही; प्रियंका गांधींचा अमित शहांवर घणाघात
ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद, देशाची सुरक्षा या सर्वांवर केंद्र सरकारने चर्चा केली. पण या दरम्यान सतत एक गोष्ट खटकत होती. त्या दिवशी 22 एप्रिल 2025 ला 26 नागरिकांना आपल्या कुटुंबियांसमोरच खुलेआम मारण्यात आले. मग हा हल्ला कसा झाला? का झाला? असे सावल उपस्थित करत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी सरकारच्या धोरणांची चिरफाड केली. मणिपूर जळालं, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम हल्ला झाला आणि अमित शहा अजूनही गृहमंत्रीपदावर का आहेत? पंतप्रधान मोदी ऑपरेशन सिंदूरचे श्रेय घेतात. पण फक्त श्रेय घेण्याने नेतृत्व बनत नाही, असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला.
कश्मीरमध्ये दहशतवाद संपला आहे, असा प्रचार गेल्या काही काळापासून केंद्र सरकारकडून करण्यात येत होता. कश्मीरमध्ये शांतता आहे. पंतप्रधानांनी मोठ-मोठी भाषणे ठोकली. कश्मीरला चला… असे म्हणत पर्यटनाचे आवाहन केले. कश्मीरला जा… जमीन खरेदी करा… तिथे आता शांतता आहे, असे पंतप्रधान बोलत होते. 22 एप्रिल 2025 ला बैसरण खोऱ्यात मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. कश्मीरच्या नयनरम्य वातावरणाचा आनंद घेत होते. तेव्हा अचानक चार दहशतवादी जंगलातून येतात आणि पर्यटकांना एक-एक करून मारतात. पत्नी समोर, मुलांसमोर 26 जणांचा जीव घेतात, असे सांगत प्रियंका गांधी यांनी मृत शुभम द्विवेदी यांची कहाणी सांगितली. बैसरणमध्ये एक तास रक्तपात सुरू होता तेव्हा या संपूर्ण घटनेवेळी एकही सुरक्षारक्षक नव्हता, असे सांगत प्रियंका गांधी यांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सरकारच्या दावे खोडून काढले.
Operation Sindoor वर अमित शहांचे लोकसभेतील उत्तर म्हणजे ब्लेम गेम; विरोधकांचा आरोप
पहलगाममध्ये हल्ल्या वेळी सुरक्षा का नव्हती? तिथे एकही जवान का नव्हता? सरकारला माहिती नव्हतं तिथे शेकडो पर्यटक येतात? तिथे जाण्यासाठी जंगलातून जावं लागतं, हे सरकारला माहिती नव्हतं का? पर्यटकांना भगवान भरोसे सोडून देण्यात आले. हल्ल्याची जबाबदारी कोणाची आहे? या देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी पंतप्रधानांची नाही का? गृहमंत्र्यांची नाही का? संरक्षणमंत्र्यांची, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची ही जबाबदारी नाही का? असा हल्लाबोल प्रियंका गांधींनी यावेळी केला.
पहलगाम हल्ल्याच्या दोन आठवड्यापूर्वी गृहमंत्री कश्मीरला गेले होते. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गेले होते. दहशतवादावर विजय मिळवला आहे, असे त्यावेळी ते म्हणाले होते. हल्ल्याच्या तीन महिन्यानंतर जम्मू-कश्मीरचे राज्यपाल एका मुलाखतीत पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतात. पण तेवढ्यावरच संगळं काही संपतं. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना टीआरएफने घेतली. ही संघटना 2019 ला बनली आणि 2020 कश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरू केल्या. एप्रिल 2020 पासून ते 22 एप्रिल 2025 पर्यंत या संघटनेने 25 दहशतवादी हल्ले केले, अशी माहिती देत प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारच्या कश्मीर विषयीच्या धोरणाची चिरफाड केली. 2023 मध्ये तीन वर्षांनी केंद्र सरकारने टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित केले. काय कारण होतं तीन वर्षे लागली टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित करायला? असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला. हे सर्वकाही सरकारला माहिती होते. पण सरकारच्या कुठल्याही सुरक्षा यंत्रणेला इतका भयंकर हल्ला होईल याचा सुगावा का लागला नाही? पाकिस्तानमध्ये बसून हल्ल्याचा कट रचला गेला. 26 लोकांना मारण्यात आले. आणि आपल्याला काहीच माहिती नाही. हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे की नाही? हे खूप मोठे अपयश आहे, असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला. गुप्तचर यंत्रणांनी याची जबाबदारी घेतली का? आयबीच्या प्रमुखांनी पदाचा राजीनामा दिला? गुप्तचर यंत्रणा गृहमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रात येतात. मग गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का? राजीनामा सोडाच जबाबदारी तरी घेतली का? असा सणसणीत टोला प्रियंका गांधी यांनी गृहमंत्री अमित शहांना लगावला.
तुम्ही इतिहासाच्या गोष्टी करतात आम्ही वर्तनामानावर बोलतो. मुंबईवर 2008 ला दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्यातील दहशतवाद्यांना तिथेच कंठस्नान घालण्यात आले. त्यातील एक वाचला होता, त्यालाही 2012 मध्ये फासावर लटकवण्यात आले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता, देशाच्या गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेत राजीनामा दिला होता. आम्ही जबाबदारी घेतली, देशाच्या जनतेसाठी, देशाच्या मातीसाठी, असे प्रियंका गांधी यांनी गृहमंत्री अमित शहांना सुनावले. गृहमंत्री अमित शहांच्या नाकाखाली संपूर्ण मणिपूर जळालं, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाममध्ये हल्ला झाला आणि अजूनही ते गृहमंत्रीपदावर आहेत, का? असा हल्लाबोल प्रियंका गांधी यांनी केला.
“फक्त श्रेय घेतल्याने नेतृत्व बनत नाही, जबाबदारीही घ्यावी लागते”
ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याने आपले शौर्य दाखवले. मात्र, ऑपरेशन सिंदूरचे श्रेय पंतप्रधानांना हवे आहे, त्यांनी ते श्रेय घ्यावे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यावर त्याचंही ते श्रेय घेतात. पण फक्त श्रेय घेतल्याने नेतृत्व बनत नाही, जबाबदारीही घ्यावी लागते, असे म्हणत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. गृहमंत्री म्हणाले, पाकिस्तानकडे शरणागती पत्करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मग तुम्ही त्यांना शरण का दिली. ते देशात येतात आणि नागरिकांना मारून टाकतात. आणि तुम्ही त्यांना शरण देतात? याचे उत्तर त्यांनी का दिले नाही? शरणागतीचा मुद्दा उपस्थित होताच गृहमंत्री इतिहासात गेले. नेहरूंनी, इंदिरा गांधींनी काय केले? इतकेच नाही तर माझ्या आईच्या अश्रूंवर बोलले. पण युद्धविराम का केला? ही लढाई का थांबवली? याचे उत्तर दिले नाही, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला.
“पलगाम हल्ल्यात मारले गेले ते हिंदुस्थानी होते”
माझ्या आईच्या अश्रूंवर गृहमंत्री बोलेले. याचे उत्तर मी देते. माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू होते जेव्हा तिच्या पतीला अतिरेक्यांनी शहीद केले. त्यावेळी त्या फक्त 44 वर्षांच्या होत्या. आणि आज मी या सभागृहात उपस्थित आहे आणि त्या 26 मृतांबद्दल बोलतेय ते यासाठी कारण मी त्यांचे दुःख जाणते… समजू शकते, अशा शब्दांत प्रियंका गांधी गृहमंत्री अमित शहांच्या टिकेला खणखीत प्रत्युत्तर दिले. पलगाम हल्ल्यात मारले गेले ते हिंदुस्थानी होते, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. यावरून हिंदू… हिंदू… अशा घोषणा भाजप खासदारांनी दिल्या. पण प्रियंका गांधी यांनी ते हिंदुस्थानी होते, असे ठणकावून सांगितले. यानंतर प्रियंका गांधी यांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांची नावे वाचली. यावेळीही सत्ताधारी खासदारांनी हिंदू… हिंदू… अशा घोषणा दिल्या तर काँग्रेस खासदारांनी हिंदुस्थानी… हिंदुस्थानी असे म्हणत प्रत्युत्तर दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List