केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरू; लवकरच तारखा जाहीर होण्याची शक्यता
केंद्रीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी अचनाक राजीनामा दिला आणि राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केल्याने आता नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. आयोगाने बुधवारी एक प्रसिद्धी पत्रक जारी करून याबाबतची माहिती दिली आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की, गृह मंत्रालयाने 22 जुलै रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. उपराष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. धनखड यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी त्यांचा राजीनामा मंजूर केला.
राज्यघटनेच्या कलम 68 अंतर्गत, उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे, नियमांनुसार, ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी लागते. या संदर्भात, निवडणूक आयोगाने एक अधिसूचना जारी केली आहे. उपराष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते, ज्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेतील निवडून आलेले आणि नामांकित सदस्य असतात.
उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला किमान 20 प्रस्तावक आणि 20 समर्थकांचे इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य असलेल्यांचे समर्थन आवश्यक असते. त्यांना नामांकनासोबत 50,000 रुपयांची सुरक्षा हमीची रक्कम देखील जमा करावी लागते.
उमेदवार भारताचा नागरिक असावा. वय किमान 35 वर्षे असावे. तो राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी पात्र असावा. त्यांनी कोणत्याही लाभाच्या पदावर राहू नये अशा पात्रता राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List