महू धरणाच्या भिंतीवर काटेरी जंगलाचा विळखा, 30 वर्षांपासून धरणाचे काम प्रलंबित
सातारा जिह्यातील जावळी तालुक्यातील महू धरणाच्या भिंतीवर वाढलेले काटेरी जंगल आणि झाडेझुडपे आता धरणाच्या अस्तित्वालाच धोकादायक ठरत आहेत. 1996 साली सुरू झालेलं हे धरण अजूनही पूर्ण झालेलं नाही. आता या धरणाच्या भिंतीवर बाबळी, लिंब आणि इतर काटेरी झाडांचा विळखा पडला आहे.
महू धरणाची उभारणी 1996 साली 63 कोटींच्या अंदाजपत्रकावर सुरू झाली होती. मात्र, आज 2025 मध्येही हे धरण पूर्णत्वाला पोहोचलेले नाही. दरम्यान, खर्चाचा आकडा तब्बल 700 कोटींच्यावर पोहोचला आहे. या धरणामुळे सुमारे पाच हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती, असा दावा केला गेला. पण वास्तवात आजही या धरणाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले नाही.
धरणाच्या भिंतीवर वाढलेल्या झाडाझुडपांची मुळे भिंतीमध्ये खोलवर जाऊन भिंतीला तडे जाऊ शकतात आणि भविष्यात धरणातून गळती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने स्थानिकांमधून तीक्र संताप व्यक्त होत आहे.
या धरणाच्या भिंतीवर वाढलेल्या जंगलाकडे कृष्णा पाटबंधारे विभाग, सातारा यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झालेले आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा झाडं हटवण्याची, संरक्षक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
धरण उभारणीचा उद्देशच अपूर्ण असेल आणि आता त्याच धरणाच्या भिंतीला तडे जाण्याचा धोका निर्माण होत असेल, तर हा संपूर्ण प्रकल्प म्हणजे एक अपयशाचं प्रतीकच ठरत आहे. धरणाच्या भिंतीवर काटेरी झाडं वाढतील आणि अधिकारी शांत बसतील, हे कसं चालेल? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
धरणाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने झाडेझुडपं काढावीत, भिंतीची मजबुती तपासावी आणि लवकरात लवकर धरण पूर्णत्वास नेऊन पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
धरणाच्या भिंतीवर जंगल उगवतंय आणि प्रशासन झोपलंय ही अवस्था बदलणं अत्यावश्यक आहे. अन्यथा हे धरण भविष्यात धोक्याचं ठिकाण ठरेल आणि त्याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर असेल.
– अविनाश दुर्गवळे, सामाजिक कार्यकर्ते, जावळी
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List