आरोपीचा विनयभंगाच्या तुरुंगातून सुटताच उन्माद; पिडीत तरुणीच्या घरासमोर फटाके वाजवून मिरवणुक
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून गुन्हेगारांवर वचक नसल्याचे दिसून आले आहे. विनयभंगाच्या आरोपीने तुरुंगातून सुटताच उन्माद दाखवत पीडित तरुणीच्या घरासमोर फटाके वाजवून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. रोहित झा असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा पश्चाताप दिसून आला नाही. या उन्मादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलीसांनी झा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात 27 एप्रिलच्या रात्री हंशू झा, रोहित झा, सोनमणी झा आणि बिदू यादव हे एका घराचा दरवाजा तोडून घरात घुसले. तसेच दोन तरुणींना जबदरस्तीने बाहेर खेचले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली होती. या प्रकरणातील रोहित झा या आरोपीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. आधारवाडी कारागृहातून सुटल्यावर त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्याला रमाबाई टेकडी परिसरात आणण्यात आले.
तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार कसा?
ज्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप झा याच्यावर होता, तिच्याच घरासमोर फटाके फोडत, ढोलताशे वाजवून विकृत सेलिब्रेशन करण्यात आले. या प्रकरणाचा पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी गंभीर दखल घेतली असून झा याच्यावर मिरवणूक काढल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान विनयभंगाचे आरोपी अशा प्रकारे मिरवणूक काढून दहशत निर्माण करत असतील तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार तरी कसा, असा संतप्त सवाल उल्हासनगरवासीयांनी केला आहे.
भाईंदरमध्ये ड्रग्जमाफियांची पोलिसांनी काढली धिंड
जामिनावर सुटलेल्या ड्रग्जमाफियांनी सेलिब्रेशन करत जंगी मिरवणूक काढल्याची घटना भाईंदरच्या नयानगर भागातही घडली आहे. कामरान खान, फहाद सय्यद, राशीद शेख, फरहान खान, सलीम खान यांना ड्रग्जची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. त्यापैकी कामरान खान याची 16 जुलै रोजी जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून सुटताच बाहेर त्याची मिरवणूक त्याच्या समर्थकांनी काढली. तसेच भाईंदरमध्येही त्याच्या अन्य साथीदारांसह वाजतगाजत मिरवणूक काढली. ही बाब पोलिसांना समजाताच त्यांनी सर्व आरोपींवर पुन्हा गुन्हा दाखल केला. तसेच सर्व माफियांची अक्षरशः धिंड काढली
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List