पवई तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे जलचरांना धोका, रायगडमधील नद्या-खाडय़ांमध्ये प्रदूषण
मुंबईतील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पवई तलावात सोडण्यात येणाऱया सांडपाण्यामुळे आणि गाळामुळे जलचरांना धोका निर्माण झाल्याचे मुंबई महानगर पालिकेने मान्य केले आहे. त्याशिवाय राज्यातील इतर जलाशयांमध्येही प्रदूषणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
पवई तलावातील वाढत्या प्रदूषणाबद्दल आमदार राजू तोडसाम यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. पवई तलावात मोठय़ा प्रमाणावर सोडण्यात येणारे सांडपाणी, गाळ व जलपर्णीची झालेली वाढ यामुळे जीवाणूंची वाढ होऊन पाण्याचा दर्जा खालावल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामुळे जलचरांना धोका निर्माण झाल्याचे मान्य केले आहे. या तलावात मगर, मासे, पक्षी व इतर जलचरांचे जीवनमान धोक्यात आल्याचेही लेखी उत्तरात मान्य केले आहे.
तक्रारीची दखल नाही
पवई तलावातील प्रदूषणाबाबत नागरिकांनी मुंबई महानगर पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने सेव्ह पवई लेक या मोहिमे अंतर्गत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, असे लेखी उत्तरात सरकारने मान्य केले आहे. सध्या मुंबई महानगर पालिकेच्या वतीने जल अभियंता विभागाच्या वतीने तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. पवई तलावातील गाळाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जैवविविधतेचा समतोल विचारात घेऊन तलावाच्या पृष्ठभागावर वाढलेली जलपर्णी तलावातून बाहेर काढून विल्हेवाट लावण्याचे काम केले जात असल्याचे सरकारने म्हटले आहे.
रायगड जिह्यातील नद्यांमध्येही प्रदूषण
दरम्यान रायगड जिह्यातील अलिबाग, पेण, महाड, रोहा, पाताळगंगा, माणगाव तसेच पनवेल परिसरातील औद्योगिक क्षेत्रात अडीच हजारांहून अधिक रासायनिक पंपन्याचे दूषित पाणी नदी-नाल्यात सोडण्यात येत असल्याने नद्या-खाडय़ा प्रदूषित झाल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार रईस शेख यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मान्य केला आहे. या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणाच्या संदर्भात मार्च 2024 ते जून 2025 या काळात 97 उद्योगांना नोटीस दिल्या आहेत. तर 15 उद्योग बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List