विधिमंडळाच्या संसदीय सभ्याचाराला हरताळ, पावसाळी अधिवेशनात शिष्टाचाराचा पावलोपावली भंग
>> राजेश चुरी
विधिमंडळ हे कायदे बनवणारे व जनतेच्या समस्या मांडण्याचे पवित्र सभागृह आहे. लोकशाहीतल्या या सर्वोच्च सभागृहातील कामकाजात अडथळा आणू नये, विधानसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊ नये, सभागृहाच्या हौदात घोषणाबाजी करू नये, सदस्यांनी एकमेकांवर ओरडू नये, असा ‘संसदीय सभ्याचार आणि शिष्टाचार असलेली आचारसंहित’ महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने तयार केली आहे. पण यंदाच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात पावलोपावली संसदीय सभ्याचाराला हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. गंभीर बाब म्हणजे त्यात सत्ताधारी सदस्यांनी आघाडी उघडली होती.
विधिमंडळ सचिवालयाने 2024मध्ये ‘संसदीय सभ्याचार आणि शिष्टाचार आचारसंहिता’ प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये आमदारांनी सभागृहात कसे वर्तन करावे याचे संपूर्ण शिष्टाचार नमूद केले आहेत. पण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात झालेल्या गोंधळानंतर दोन्ही बाजूंकडील सदस्यांनी संसदीय शिष्टाचाराचा भंग केल्याचे वर्तनावरून दिसून आले.
अभिवादनाचा सदस्यांना विसर
पिठासीन अधिकारी जेव्हा सभागृहात येतात तेव्हा सदस्यांनी आपल्या जागेवर उभे राहावे. पीठासीन अधिकारी यांच्या आगमन प्रसंगी सदस्यांनी पीठासीन अधिकारी आसनावर बसेपर्यंत गँगवेमध्ये उभे राहावे. त्यानंतर आपल्या जागी यावे. सभागृहातून जाताना किंवा सभागृहात येताना सदस्यांनी पिठासीन अधिकाऱयांना अभिवादन करावे असे शिष्टाचार आहेत. पण याचा अनेक सदस्यांना विसर पडला.
तंबाखू-गुटख्याच्या पुडय़ा
सदस्यांनी सभागृहात धूम्रपान करणे शिष्टाचाराला धरून नाही असे नमूद केले आहे. पण अनेक पक्षाचे सदस्य एकमेकांना गुटखा, तंबाखूच्या पुडय़ा दिल्याचे आणि तंबाखू मळतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सत्ताधारी पक्षाचे दोन मंत्रीच एकमेकांना कसल्या तरी पुडय़ा देतानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला.
सदस्यांचे बेशिस्त वर्तन
सभागृहातील कामकाजात अडथळा आणण्याच्या उद्देशाने पीठासीन अधिकाऱयांच्या आसनाजवळ जाणे आणि पिठासीन अधिकाऱयांचा माईक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नये, आदी नियम आहेत. पण पावसाळी अधिवेशात काँग्रेसच्या एका सदस्याने अध्यक्षांच्या आसनाकडे थेट धाव घेतली. इतर दिवशीही वेगवेगळ्या मुद्दय़ांवरून सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. एकमेकांवर ओरडाआरड झाली होती. संसदीय सभ्याचाराचे नियम अनेक सदस्यांनी पायदळी तुडवले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List