ट्रम्प आणि मस्क यांच्यात धतिंग; डुक्कर काय, दुकान काय… दोघांनी नळावरच्या भांडणालाही लाजवले!
‘बिग ब्युटिफूल’ बिलावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्यात सुरू झालेल्या वादाला नळावरच्या भांडणाचे स्वरूप आले आहे. हे बिल पास झाल्यास नवा राजकीय पक्ष काढेन, असा इशारा मस्क यांनी दिला. तर, अमेरिकन सरकारकडून सर्वाधिक अनुदान मिळणारे मस्क हे आतापर्यंतचे एकमेव व्यक्ती आहेत. हे अनुदान बंद झाल्यास दुकान बंद करून त्यांना पुन्हा दक्षिण आफ्रिकेत जावे लागेल, असे ट्रम्प यांनी सुनावले.
सरकारी खर्च कमी करण्याच्या उद्देशाने ट्रम्प सरकारने एक विधेयक आणले आहे. ईव्ही उद्योगाला मिळणाऱ्या कर सवलतीत मोठी कपात करण्याची तरतूद यात आहे. याशिवाय, इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. मस्क यांनी या विधेयकास कडाडून विरोध केला आहे. हे ‘कर्ज गुलामगिरी’ विधेयक आहे. ते मंजूर झाल्यास अमेरिकेतील उद्योग उद्ध्वस्त होतील. देश कर्जाच्या खाईत लोटला जाईल. देश डुक्कर पार्टीच्या कचाटय़ात सापडलाय हेच या वेडगळ बिलातून दिसून येते. त्यामुळे आता लोकांची काळजी घेणारा नवा राजकीय पक्ष काढण्याची वेळ आली आहे, असे मस्क म्हणाले.
मस्क यांना आफ्रिकेत जावे लागेल!
ट्रम्प यांनी मस्क यांच्या या टीकेला तितकेच तिखट प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी इलेक्ट्रिक वाहनांच्या अतिरेकी वापराच्या विरोधात आहे याची मस्क यांना सुरुवातीपासून कल्पना होती. ईव्ही चांगल्या आहेत, पण त्यासाठी लोकांवर बळजबरी करता येणार नाही. एलॉन मस्क यांना जगातील कोणाहीपेक्षा जास्त सबसिडी मिळते. ही सबसिडी बंद झाली तर त्यांना दुकान बंद करून पुन्हा दक्षिण आफ्रिकेला जावे लागेल, असा टोला ट्रम्प यांनी मस्क यांना हाणला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List