श्री विठ्ठल मंदिर परिसरात VIP वाहनांना बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा मोठा निर्णय

श्री विठ्ठल मंदिर परिसरात VIP वाहनांना बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा मोठा निर्णय

>> सुनील उंबरे

वयोवृद्ध भाविकांना धक्के मारत गर्दीतून वाट काढणाऱ्या व्हीआयपी वाहनांना आजपासून श्री विठ्ठल मंदिर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. आषाढी वारी नियोजनाचा आढावा घेण्याच्या निमित्ताने मंत्री महोदय व अधिकाऱ्यांची पंढरीत वर्दळ वाढली असून या व्हीआयपींच्या गाड्यांचे ताफे भाविक, ॲम्ब्युलन्स, अग्निशामक आदींना त्रासदायक ठरू लागल्याने सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे वारकरी भाविक आणि पंढरपूरकरांना वारी सुसह्य होणार आहे.

येत्या 6 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून दिंड्या आणि पालख्या पंढरीकडे निघाल्या आहेत. सोहळ्यासाठी बराच अवधी असला तरी वारीच्या गर्दीत दर्शनाला वेळ लागतो म्हणून बहुतांश भाविक वारीपूर्वी दर्शनाला गर्दी करीत आहेत.

श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी दररोज पन्नास हजाराहून अधिक वारकरी भाविकांची गर्दी आहे. सुट्टीच्या दिवशी हा आकडा दोन लाखावर जातो. यामुळे दिवसभर मंदिर परिसर गजबजलेला असतो. या गर्दीतून व्हीआयपींच्या दहा दहा, वीस वीस चारचाकी गाड्या वयोवृद्ध वारकऱ्यांना धक्के मारीत मंदिराजवळ गर्दी करतात.

सध्या वारीचे नियोजनाचा आढावा घेण्याच्या निमित्ताने दररोज मंत्री, वरिष्ठ अधिकारी पंढरपूरला भेट देत आहेत. बैठक आणि नियोजनाची पाहणी केली की या व्हीआयपींचा ताफा थेट मंदिराकडे निघतो. या ताफ्यात मंत्र्यांचे जिल्हाभरातून आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपली वाहने मंदिर परिसरात घेऊन जाण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घालतात. भाविकांना केवळ वाहनांना त्रास नाही तर मंत्र्याबरोबर मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांची अरेरावी आणि धक्काबुक्की सहन करावी लागते. या व्हीआयपी दर्शनामुळे अनेक तास दर्शन रांगेत उभे असणाऱ्या भाविकांच्या समस्येत आणखी भर पडते. स्थानिक प्रशासनाला हे सगळं माहित असून देखील मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची हा यक्ष प्रश्न होता.

सोलापूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या बाबत आज अतिशय धोरणात्मक निर्णय घेत वारकरी भाविकांना आणि पंढरपूरकरांना दिलासा दिला आहे.आज पासून छत्रपती शिवाजी चौकात व्हीआयपींच्या गाड्यांना श्री विठ्ठल मंदिराकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या चौकात व्हीआयपींच्या गाड्या थांबवून तिथून मंदिर समितीच्या इलेक्ट्रिक वाहनांनी मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना मंदिराकडे घेऊन जाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

मिंधे गटाचे मंत्री भरत गोगावले श्री विठ्ठल दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांच्या ताफ्यात एक डझनहून अधिक गाड्यांचा ताफा होता. मंदिर परिसरात या गाड्या लागल्याने, अंब्यूलन्सला रस्ता मिळाला नाही. मंदिराबाहेर गाड्यांचा गोंधळ सुरू असताना गोगावले यांच्या सोबत आलेल्या एका पदाधिकाऱ्याने, मंदिर समितीच्या व्यवस्थापकाला आणि सुरक्षा रक्षकाला अरेरावीची भाषा वापरली. या वादादित प्रकरणानंतर मंदिर समितीच्या वतीने पोलीस कारवाई करण्याच्या हालचाली सुरु असताना सदर पदाधिकाऱ्याने मंदिर समितीची माफी मागून विषयाला पूर्णविराम दिला.

व्हीआयपींचे लाड करू नका

श्री विठ्ठलाच्या दर्शनाला वयोवृद्ध भाविक शेकडो किलोमीटरचे अंतर पायी चालत येतात. मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना पाच मिनिटे चालत जायला काय हरकत आहे. उगाच व्हीआयपींचे लाड करु नयेत सामान्य वारकऱ्यांना अधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत. व्हीआयपींना विशेष वाहनाची सेवा दिली की त्याचा त्रास होणारच आहे. त्यामुळे समितीने वाहने देवू नये दिली तर ती बंद पडली जातील.

हभप अरुण महाराज बुरघाटे, अध्यक्ष, विश्व वारकरी सेना

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;