Air India Plane Crash – गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावरही काळाचा घाला
अहमदाबाद विमान दुर्घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला. गुजरातसाठी गुरुवारचा दिवस खूप दुर्दैवी ठरला. या अपघातात गुजरातचे 16वे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावरही काळाने घाला घातला. विमान अपघातात जीव गमावणारे विजय रुपाणी हे गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री आहेत. सहा दशकांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांचे विमान अपघातात निधन झाले होते. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा पेंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी विजय रुपाणी यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला.
ही दुर्घटना खूप मोठी आहे. देव मृतांच्या आत्म्याला शांती देवो, अशी भावना सी.आर. पाटील यांनी व्यक्त केली. म्यानमारमध्ये जन्म झालेले विजय रुपाणी हे पाच वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2016मध्ये आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्या वेळी रुपाणी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. त्याच्या पुढल्या वर्षी 2017मध्ये भाजपने गुजरातची निवडणूक जिंकली होती. तेव्हाही रुपाणी यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ते एक शांत स्वभावाचे नेते मानले जायचे. त्यांच्या अपघाती मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List